केंद्र आणि राज्य सरकार तसेच खासगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या वेतन धारकांना संगणकीय त्रुटी व ढिल्या कारभारामुळे निवृत्ती वेतनापासून दूर राहावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये गुरूवारनंतर स्टेट बँक ऑफ इंडियातून अनेक निवृत्ती वेतन धारकांना पेन्शनची रक्कम न जमा झाल्याने निराश होऊनच घरी परतावे लागले.

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा होत असते. या निवृत्ती वेतन धारकांची माहिती ऑनलाईन करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात अंबरनाथच्या बँकेच्या शाखेत  हयातीच्या दाखल्यासाठी बायोमेट्रीक पद्धतीने हाताचे ठसे आणि आधार कार्ड भरण्याचे काम सुरू होते. मात्र ही माहिती भरतानाही संकेत स्थळ वारंवार बंद पडत होते. तरी पुढील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप अनेक निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे बँकेने पुन्हा हयातीच्या दाखल्याचे अर्ज हाताने भरून घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारकांची गैरसोय होत आहे. मात्र ही माहिती हाताने भरून दिलेल्या निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यातही अद्याप वेतनाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारक हवालदील झाले आहेत.

माहीती भरली पण..

निवृत्ती वेतन धारकांची सर्व माहिती आमच्याकडून जीवनप्रमाण या संकेत स्थळावर भरण्यात आली असून ही माहिती बँकेकडून भरल्याचे दाखवण्यात येत आहे. मात्र, भारत सरकारच्या संकेत स्थळावर ही माहिती अपडेट होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.येत्या १५ जानेवारीपर्यंत सर्वच निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.