अरुंद रस्ते, जागोजागी होणारी वाहनांची कोंडी, वाहनतळाचा अभाव आणि मोकळ्या जागांच्या नियोजनाअभावी बकाल झालेल्या जुन्या ठाण्याला नवा रंग देण्याचा प्रयत्न ठाणे पालिकेने सुरू केला असून रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ७५० हेक्टर जागेवर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नवे ठाणे विकसित करण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात वाहनतळ, उद्याने, लहान-मोठे उड्डाणपूल अशा विविध प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असा दावा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी केला.
सिडकोकडे मोठय़ा प्रमाणावर मोकळी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे एखादे लहान शहर विकसित करण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. ठाण्यातही मोकळ्या जमिनीवर विकासाचे प्रारूप उभा करण्याचा पर्याय महापालिकेपुढे उपलब्ध असला तरी ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुनर्विकास प्रकल्पाचे प्रारूप स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी या वेळी दिली. ठाण्याच्या अत्यंत दाटीवाटीच्या अशा या परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासंबंधीचा विस्तृत आराखडा येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूह विकास योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास शक्य असून त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.

महापालिकेने तयार केलेल्या आराखडय़ानुसार ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस एकत्रित वाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. यानुसार स्थानकाच्या पूर्वेकडे सॅटिससारख्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून वाहनतळ आणि बस आगारांसाठी जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्या सिग्नल यंत्रणा, बस स्थानके, पादचारी पुलांची उभारणीचे उद्दिष्ट, तसेच मोकळ्या जागा आरक्षित करण्याचे ठरले आहे.