वाढदिवसानिमित्ताने समर्थकांची शहरभरात ‘भावी आमदार’ म्हणून फलकबाजी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत असताना उल्हासनगरात भाजपशी जवळीक असणारे पप्पू कलानी पुत्र ओमी यांना विधानसभेचे वेध लागल्याचे चित्र आहे. ज्योती कलानी यांनी ओमी यांच्याबरोबर युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केल्याचे छायाचित्र अलीकडेच प्रसारित झाले होते. आता ओमी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर जोरदार फलकबाजी करण्यात आली आहे. फलकांवर त्यांचा उल्लेख भावी आमदार असा केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचे कळते.

उल्हासनगर शहर हे एके काळी कलानी कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजले जात असे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबावर मात करीत आमदारकी मिळवली होती. २०१४ च्या भाजप लाटेत आयलानी यांचा पराभव झाला. त्या वेळी पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती राष्ट्रवादीतून विजयी झाल्या. त्यामुळे शहरात पुन्हा कलानीकेंद्रित राजकारणाला सुरुवात झाली. पुढे २०१७ मध्ये भाजपने ओमी कलानी गटाला जवळ केले. ओमी कलानीच्या पत्नीला महापौरपद देऊन कलानी कुटुंबीयांची मते आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले. निष्ठावान भाजप कार्यकर्ते मात्र, यामुळे दुखावले गेले.

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही ओमी कलानी गटाकडे मदत मागितली आहे. प्रचाराचा धुराळा उडत असताना कलानी गटाने पुन्हा एकदा विधानसभेवरचा दावा केला आहे. वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर ओमी यांचा भावी आमदार असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ज्योती कलानी यापुढे निवडणुकीच्या रिंगणात नसतील आणि ओमी कलानीच कलानींचे राजकारण पुढे नेतील, हे जवळपास निश्चित  झाले आहे. आता आमदारकीचे प्रमुख दावेदार कुमार आयलानी यांच्या डावलून ओमी यांना उमेदवारी मिळते का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. फलकबाजीमुळे शिवसेना आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींची मात्र कोंडी झाली आहे.