कल्याण-डोंबिवलीत ३५० फलकांवर कारवाई : तिघांवर गुन्हे दाखल

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शहरातील विविध भागांमध्ये विविध पक्षांचे झेंडे, बॅनर, पोस्टर, होर्डिग्ज आणि भित्तीपत्रके कायम आहेत. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने बेकायदा बॅनरवर कारवाई सुरू करण्यात आली. सुमारे ३५० फलकांवर कारवाई करून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ८२ झेंडे, ११२ फलक, ३ पोस्टर, ४ होर्डिग्ज, तसेच १४ भित्तीपत्रकांचा समावेश आहे.

’कल्याण-डोंबिवली शहरामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू असून महापालिकेच्या वतीने ३ ऑक्टोबरपासून फलकबाजीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

’या कारवाईत विविध पक्षांचे ८२ झेंडे काढण्यात आले. या झेंडय़ांमध्ये सर्वाधिक झेंडे हे डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागात असून त्या खालोखाल कल्याणमधील ‘ब’ प्रभागामध्ये आढळून आले आहेत.

’बॅनर्सची संख्याही याच परिसरात मोठी असल्याचे दिसून आले आहे.

’कारवाई सुरू झाल्याने अनेक पक्षांनी आपले बॅनर उतरवून घेण्यास सुरुवात केली आहे.

’ महापालिकेचे पथक विविध भागांमध्ये फिरून कारवाई करत असल्याचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.