दोन दिवसांपूर्वी किन्हवली मार्गावर एका निलगायीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मुंबई-नाशिक महामार्गावर आटगाव येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. अडीच वर्षाचा नर जातीचा बिबट्या पाणवठ्याच्या शोधात रस्ता ओलांडत असावा, असा अंदाज शहापूर वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी शहापूर वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक वसंत घुले, सहाय्यक वनसंरक्षक आर. एच. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन परिमंडळ अधिकारी सुनिल भोंडीवले यांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

आसनगाव येथील काष्ठ विक्री केंद्रात मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सरोदे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तानसा अभयारण्यालगतच ही घटना घडली असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा संचार असल्याने पाणवठ्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येत आहेत. यातूनच बिबट्याला अपघाताला सामोरे जावे लागले असण्याचा अंदाज आहे.

या घटनेमुळे अभयरण्यासह वनक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अशा घटनांमुळे दिवसेंदिवस वन्यजीवांची कमी होणारी संख्या चिंताजनक असून वनविभाग व वन्यजीव विभागाने याबाबत ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.