‘तलावांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहरालगत असलेले नवी मुंबई हे शहरही तलावांच्या बाबतीत मागे नाही. या नियोजनबद्ध शहरातही अनेक कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून ते या शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. कोपरखरणे येथील धारण तलावही त्यापैकीच एक. निसर्गसौंदर्याचा परिपूर्ण tv13नमुना असलेला हा तलाव परिसर अतिशय शांत व रमणीय आहे. फेरफटका मारण्यासाठी आणि सहजसफर करण्यासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे.
नवी मुंबई महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी कोपरखरणे येथील खाडीलगत हा तलाव निर्माण केला. पूर्वी दरुगधीयुक्त परिसर असलेल्या या ठिकाणाची जागा या रम्य तलावाने घेतली आणि या परिसराचा कायापालट झाला. ठाण्यातील सौंदर्याने नटलेल्या उपवन तलावाची आठवण करून देईल इतका हा तलाव परिसर रमणीय करण्यात आलेला आहे. या तलावाभोवती सुंदर बगिचा फुलविण्यात आला असून, नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी तलावाभोवतीच खास रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या बाजूला हिरवळ तयार करण्यात आल्याने हा रस्ताही खूप सुशोभित वाटतो. अनेक फुलझाडे, डेरेदार वृक्ष या तलावाच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात.
तलावाभोवतालच्या बगिच्यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वृद्धांना आराम करता यावा यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक असल्याने तरुणांची सकाळी सकाळी येथे खूपच गर्दी असते. अतिशय नयनरम्य असलेला हा परिसर फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सुटीच्या दिवशी संध्याकाळी तर येथे लोकांची जत्राच भरते. हा नवी मुंबईतील सर्वात मोठा तलाव असून येथे लवकरच बोटिंगची व्यवस्था करण्याचा महापालिकेचा विचार आहे. या परिसरात नाटय़गृह व क्रीडासंकुल लवकरच उभारण्यात येणार असून त्यानंतर हा तलाव परिसर पर्यटनाचे एक केंद्रच होईल.

कोपरखरणे तलाव कसे जाल?
ट्रान्स हार्बर मार्गावरील कोपरखरणे स्थानकावर उतरावे. स्थानकापासून कोपरखरणे तलावापर्यंत रिक्षाने जाता येते. शिवाय मुंबई, ठाण्यातून जाणाऱ्या बसही उपलब्ध आहेत.