समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन स्टॉलची दुर्दशा; १९ लाखांच्या योजनेचा चुराडा

जव्हार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे पालघर जिल्हा पर्यटनासाठी ओळखला जाईल, असे स्वप्न जनतेला दाखवले असले तरी डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन स्टॉलची दुर्दशा पाहिल्यानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने डहाणू नगर परिषदेने जनतेला समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन स्टॉल उपलब्ध करून दिले. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हे स्टॉल मोडकळीस आले असून किनाऱ्यांवर धूळखात पडले आहेत. या योजनेसाठी प्रशासनाने १९ लाख रुपये खर्च केले, मात्र त्याचा चुराडा झाला आहे.

डहाणू नगर परिषदेने पाच वर्षांपूर्वी निसर्गरम्य डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन विकास व्हावा यासाठी डहाणू नगर परिषद आणि वन व्यवस्थापन समितीकडून सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत १९ लाख २५ हजार रुपये खर्च करून १९ पर्यटन स्टॉल उभारले. मात्र नगर परिषदेने केलेल्या दुर्लक्षामुळे या स्टॉलची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. या स्टॉलचे पत्रे, लाकडी पट्टय़ा चोरीला गेल्या आहेत, अनेक स्टॉल मोडकळीस आले आहेत. अनेक स्टॉलचे तर केवळ गंजलेले लोखंडी सांगाडेच उभे आहेत. या स्टॉलची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात न आल्याने ही अवस्था झाली आहे. याला लोकप्रतिनिधींची अनास्था, प्रशासनाची बेपर्वाई आणि उदासीन धोरण जबाबदार असल्याचा आरोप डहाणूकरांकडून करण्यात आला आहे.

डहाणू नगर परिषद क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आदिवासी समाज राहात आहे. त्यांना आणि गरजू नागरिकांना स्टॉल दिला तर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटू शकेल.

– कमलाकर वाढू, आंबेमोरा, डहाणू

जून महिन्यापासून डहाणू नगर परिषदेत रुजू झालो आहे. सध्या तरी पर्यटन स्टॉलवर चर्चा झालेली नाही. माहिती घेऊन त्यात सुधारणा करण्यात येईल.

– विजय दवासे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद