आता पारंपरिक सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्यामागचा प्रबोधनाचा हेतू मागे पडून त्याचा वापर निरनिराळ्या पद्धतीने आर्थिक समीकरणे जुळविण्यासाठी होऊ लागला आहे. शहरात नव्या युगाची बाजारपेठ संस्कृती रुजवू पाहणारे मॉल्सही गणेशोत्सवांचा खुबीने प्रसिद्धीसाठी वापर करू लागले आहेत. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती, सजावट कार्यशाळा, वर्तमानपत्रांच्या रद्दीपासून गणेशमूर्ती आदी विविध उपक्रम त्यासाठी राबविले जाऊ लागले आहेत.  गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. हे सण साजरे करताना मोठय़ा प्रमाणावर अर्थकारण होत असते. राजकीय पक्षांसाठी तर ही सुवर्णसंधी असते. ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून मॉल संस्कृती तग धरू पाहत आहे. आता या बडय़ा मॉलने तर चक्क उत्सवांच्या माध्यमातून स्वत:चे मार्केटिंग करण्यास सुरुवात केली आहे. आजवर उत्सवांच्या काळात मॉलमधील दुकानांमध्ये भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित केले जायचे. मात्र ग्राहकांना आपल्या दारापर्यंत आणण्यासाठी मॉलने आता नवनवीन शकला लढवायला सुरुवात केली आहे. कुठे पर्यावरणस्नेही गणपती बनविण्याच्या कार्यशाळा आयोजित करणे, त्यांची विक्री करणे असे निरनिराळे प्रयोग सध्या करण्यात येत आहेत.ठाण्यातील विविआना मॉलने प्रसिद्धीची एक आगळीवेगळी वाट निवडल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शहरात फिरून, घराघरातून वर्तमानपत्रे गोळा करून त्यापासून श्रीची मूर्ती तयार करणार असल्याची माहिती मॉलच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. यासाठी लागणारी वर्तमानपत्रे तीन हात नाका, इटर्निटी मॉल, ब्रह्मांड, घोडबंदर रोड आदी भागांतून गोळा करण्यात आली आहेत. तीन दिवसांमध्ये तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांनी यासाठी वर्तमानपत्रे दान केली आहेत. यामधून पाच फूट उंचीची गणपतीची मूर्ती तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मूर्ती खास नाशिकच्या कारागिरांकडून बनवून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्तमानपत्रापासून तयार केलेली ही मूर्ती सात दिवसांसाठी मॉलच्या आवारात बसविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘पर्यावरणस्नेही मूर्ती वापरा’ असा संदेश हा उपक्रमातून देण्यात आला आहे. मात्र गणेशोत्सवादरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही मूर्ती उत्तम पर्याय ठरणार, असे एकूण चित्र या सर्व उपक्रमांतून दिसून येते.