ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई शहरांतील बाधितांच्या संख्येत घसरण
ठाणे : जिल्ह्य़ात करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असतानाच करोना रुग्णांच्या संख्येतही आता मोठी घट दिसू लागली आहे. जिल्ह्य़ात सध्या केवळ ३ हजार ८३१ करोनाबाधित रुग्ण म्हणजेच सरासरी १.५३ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. तर ९६.०४ टक्के रुग्ण करोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या सुरुवातीपासूनच करोनाने प्रभावित राहिलेल्या शहरांमध्येही रुग्णांची संख्या रोडावली आहे.
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांना गेल्या दहा महिन्यांपासून करोनाचा विळखा बसला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या तीन शहरांत चाचण्यांची संख्या मोठी असल्याने येथे करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाणही सुरुवातीपासूनच मोठे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र रुग्णांची संख्या रोडावू लागल्याने स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आता लस मोहिमेकडे लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत. जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटक असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या पंधरवडय़ात दररोज दिवसाला केवळ २५० ते ३५० इतके रुग्ण आढळून येत आहेत. त्यातही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली करोनाचे केंद्र असलेल्या शहरांत १०० किंवा त्याहून कमी रुग्ण आढळून येत आहे. तर उर्वरित शहरांच्या रुग्णसंख्येतही घट झालेली आहे. महापालिकांच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हे चित्र निर्माण झालेले आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात एकूण २ लाख ४९ हजार ७३५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी २ लाख ३९ हजार ८४७ रुग्ण विविध खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचारानंतर बरे झालेले आहेत. केवळ ३ हजार ८३१ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे, तर ६ हजार ५७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी १.५३ इतकी असून गेल्या दहा महिन्यांत प्रथमच रुग्णांची संख्या इतकी कमी झाली आहे. सर्वात कमी रुग्ण हे भिवंडी शहरात उपचार घेत आहेत. भिवंडी शहरात केवळ ४८ रुग्ण उपचार घेत असून सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. ठाण्यात १ हजार ८ रुग्ण उपचार घेत आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात मृतांचे प्रमाणही दिवसाला एक ते सात इतकेच असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्य़ातील रुग्ण संख्या
शहर करोना मुक्त उपचाराधीन
ठाणे ५५,१०७ १००८
कल्याण- डोंबिवली ५७,१२८ ९६९
नवी मुंबई ५०,३४२ ८२०
मीरा-भाईंदर २४,८५६ ३६५
उल्हासनगर ११,०३५ १३१
भिवंडी ६२६६ ४८
अंबरनाथ ८०५८ १०८
बदलापूर ८९०७ १३८
ठाणे ग्रामीण १८,२०७ २४४
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 2:28 am