दिवा परिसरातील वायुगळतीप्रकरणी ठाणे पोलिसांनी राजेश जयराम पाटील (३९) याला गुरुवारी अटक केली आहे. राजेशने खाडीकिनारी परिसरातील मोकळ्या जागेत रसायनाची पिंपे टाकण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी त्याला संबंधितांकडून मोबदला मिळणार होता. या मोबदल्याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
दिवा येथील डवले गावामधील खाडीकिनारी भागातील मोकळ्या जागेत रसायनाची ५८ पिंपे टाकण्यात आली होती. या भागात खड्डे खोदून पिंपांची विल्हेवाट लावत असताना त्यापैकी तीन पिंपे फुटली. त्यामुळे झालेल्या वायुगळतीचा त्रास दिवावासीयांना सहन करावा लागला होता. पोलिसांनी पुढील तपास केला असता या जागेवर पिंप टाकण्यास राजेश पाटील याने परवानगी दिल्याची माहिती पुढे आली. त्या आधारे राजेशला अटक करण्यात आली. रसायनाची पिंपे नेमकी कुणाची होती, याविषयी अद्याप त्याच्याकडून माहिती मिळू शकलेली नसून त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.