एक कोटी ३५ लाखांचे दागिने चोरीला

ठाणे : वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात रविवारी एका सराफाच्या पेढीतून एक कोटी ३५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, चोरटय़ाने चोरीसाठी सराफाच्या पेढीशेजारील गाळा दोन महिन्यांपूर्वी भाडय़ाने घेतला होता. शनिवारी रात्री पेढी बंद झाल्यानंतर चोरटय़ाने गाळ्यामधील िभत फोडून प्रवेश केला. त्यानंतर दागिने चोरून नेल्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून उघडकीस आले आहे.

शिवाईनगर येथे वारीमाता ज्वेलर्स नावाची सराफा पेढी आहे. रविवारी सकाळी पेढीचे मालक मुकेश चौधरी हे पेढी उघडण्यासाठी आले असता, त्यांना पेढीत चोरी झाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी २ किलो ४०० ग्रॅम सोने (बाजारमूल्य- १ कोटी २० लाख रुपये), ३१ किलो चांदी (बाजारमूल्य- १५ लाख रुपये)  चोरी झाल्याचे उघडकीस आले.

चोरीसाठी शेजारचा गाळा भाडय़ाने..

शिवाईनगर येथे ‘वारीमाता ज्वेलर्स’ ही सराफा पेढी आहे. या पेढीशेजारी एक रिकामा गाळा होता. दोन महिन्यांपूर्वी आरोपीने गाळा भाजीविक्रीसाठी भाडेतत्त्वावर घेतला. या भागात १५ हजार रुपये मासिक भाडय़ाने गाळा मिळतो. मात्र चोरटय़ाने २८ हजार ५०० रुपये मासिक भाडे देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मालकाने चोरटय़ाकडून कोणतीही कागदपत्रे घेतली नाहीत. दोन महिने या ठिकाणी या आरोपीने विक्रीसाठी भाजी ठेवली होती.