04 December 2020

News Flash

मधमाश्यांच्या हल्ल्यात पादचाऱ्याचा मृत्यू

ठाण्यातील धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाण्यातील धक्कादायक प्रकार

येथील पोखरण रोड नंबर २ परिसरातील रौनक पार्क संकुलाजवळ एका पादचाऱ्याचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला.

महापालिका आपत्ती निवारण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी उमेश सराफ या ५४ वर्षीय पादचाऱ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. मधमाश्यांनी हल्ला करून माणसाला ठार केल्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना आहे.

उमेश सराफ शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गॅलेक्सी कंपनीजवळ उभे असताना हा प्रकार घडला. तिथे शेजारीच असलेल्या झाडावरील मधाच्या पोळ्यावरील शेकडो माश्यांनी सराफ यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्याची घटना पाहणाऱ्या इसमाला शोधण्याचा प्रयत्न महापालिका व्यवस्थापनाने केला, मात्र रात्री उशिरापर्यंत कुणीही सापडू शकला नाही.

पहिलीच घटना

ठाणे परिसरात अनेक मोठे वृक्ष असून त्यावर मधमाश्यांची पोळी आहेत. जुन्या इमारतींच्या खिडक्यांचे सज्जे तसेच भिंतींवरही अनेकदा मधमाश्यांची पोळी आढळून येतात. मात्र यापूर्वी कधीही मधमाश्यांनी असा जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे या घटनेने सर्वच जण चक्रावून गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:05 am

Web Title: one death by honey bee attack
Next Stories
1 राज्यातील डॉक्टरांची मणिपूरमध्ये रुग्णसेवा
2 डिजीधन: ठाण्यातील ब्युटी पार्लर व्यावसायिक ठरली ‘लकी’; २५ लाखांचे बक्षीस
3 बोगस डॉक्टरांना कारवाईची मात्रा
Just Now!
X