विद्युत खांब कोसळून झालेल्या अपघातात कादंबरीकार सुदीप नगरकर गंभीर जखमी होताच खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील जुनाट आणि आयुष्य संपलेल्या विद्युत खांबांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

जुन्या विद्युत खांबांच्या जागी नवीन खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्याने पाहणी सुरू करण्यात आली असून जुने खांब बदलण्यासाठी किती पैसे लागतील याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. नगरकरांच्या बाबतीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे येथील पाचपाखाडी भागात मित्रांसोबत गप्पा मारत उभे असताना पाठीमागे असलेल्या विद्युत खांबावर शिडी लावून अनोळखी व्यक्ती जाहिरातीचा फलक लावत होते. अचानकपणे विद्युत खांब खाली कोसळून सुदीप यांच्या पाठीवर पडला. या अपघातात त्यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या अपघातप्रकरणी सुदीप यांनी महापालिकेकडे १८ लाखांची नुकसानभरपाई मागितली आहे.

‘दुर्घटनेशी संबंध नाही’
पालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील सर्वच प्रभाग समिती क्षेत्रातील विद्युत खांब सुस्थितीत आहेत का, याची पाहणी करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच या पाहणीमध्ये आयुष्य संपलेले जीर्ण खांब काढून त्या जागी नवीन खांब लावण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विद्युत खांबांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर तीन ते चार महिने आधी खांब सुस्थितीत आहेत का नाही, याची तपासणी करण्यात येते, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विद्युत खांबांची नियमित पाहणी सुरू असल्याने नगरकर यांच्या अपघाताचा त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.