वसईतील अर्नाळा ते डहाणूदरम्यान मासेमारी करणारी एक बोट बुडाली आहे. आज सकाळी काही मच्छिमार मासेमारी करण्यासाठी येथील समुद्रात गेले असताना हा अपघात घडला. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच कोस्टल गार्ड पथक बोट ज्याठिकाणी बुडाली त्याठिकाणी पोहोचले. बोटीतील दोन ते तीन मच्छिमार सुखरुप असल्याचे समजले असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ही बोट समुद्रात नेमकी किती अंतरावर आहे याबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही. बोटीवरील मच्छिमारांशी संपर्क साधण्यात अडचण येत असल्याने बचाव पथकाला आपल्या कामात अडथळा येत आहे. बुडालेली बोट सापडावी यासाठी जवान कार्यरत असून लवकरच परिस्थितीचा अंदाज येईल असे सांगण्यात येत आहे.