News Flash

टीएमटीच्या धडकेत पोलीस ठार

शेजूळ याने बेफामपणे गाडी चालवत घोडबंदर येथील गायमुख परिसरात एका टेम्पोला धडक दिली.

मद्यधुंद बसचालकाचा प्रताप; अनर्थ टळला

मद्यधुंद अवस्थेत बेफामपणे बस चालवणाऱ्या टीएमटीच्या बसचालकाच्या प्रतापामुळे वाहतूक शाखेच्या एका पोलिसाला हकनाक प्राण गमवावे लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली. गजानन शेजूळ असे या बसचालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील शेजूळला वेळीच आवर घालण्यात पोलिसांना यश आल्याने पुढील अनर्थ टळला.  शेजूळची रवानगी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत झाली आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची ठाणे-मीरा रोड बस शुक्रवारी रात्री मीरा रोड स्थानकातून सुटली. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी होती. बस थोडय़ा अंतरावर गेल्यानंतर चालक गजानन शेजूळ हा बस वेडीवाकडी चालवित असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. यामुळे बस व्यवस्थित चालविण्याचा सल्ला देण्यासाठी काही प्रवासी चालकाच्या केबिनजवळ गेले. त्यावेळी शेजूळ हा मद्याच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कारणावरून प्रवाशांनी बसचा वाहक सुनील नागरे याच्याशी वाद घातला. तसेच बस थांबिवण्यास सांगितले. मीरा रोड येथील जहांगिर कॉम्पलेक्सजवळील थांब्यावर बस थांबताच वाहक नागरे याच्यासह सर्वच प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर शेजूळ एकटाच गाडी घेऊन पुढे गेला. मद्याच्या अंमलाखाली असलेल्या शेजूळ याने बेफामपणे गाडी चालवत घोडबंदर येथील गायमुख परिसरात एका टेम्पोला धडक दिली. त्यात टेम्पोचालक जखमी झाला. त्याचवेळी तिथे वाहतूककोंडी सोडवण्याच्या प्रयत्नात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस नाईक चंद्रकांत साळुंखे (४४) यांनाही शेजूळने धडक दिली. त्यात साळुंखे जबर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेजूळने तशीच गाडी पुढे नेत एका ट्रकला धडक दिली. त्यात ट्रकचालक जखमी झाला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील शेजूळने शहराच्या दिशेने बस नेली. मात्र, तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी जुबेर तांबोळी यांनी यासंदर्भातील माहिती नियंत्रण कक्षाला देताच नागलाबंदर परिसरात शेजूळला आवर घालण्यात पोलिसांना यश आले. बस शहरात आली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. शेजूळ याला निलंबित करण्यात आले असून वाहक नागरे याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

मृत्यूनंतर नेत्रदान

कळवा परिसरातील रहिवासी असलेले चंद्रकांत साळुंखे १९९५ पासून ठाणे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा यंदा दहावीला असून मुलगी सहावीत शिकत आहे. साळुंखे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांची पत्नी कीर्ती यांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत्रदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अहमदनगर येथील सुपेगाव या मूळ गावी नेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 4:07 am

Web Title: one police dead by tmt bus accident in thane
टॅग : Thane
Next Stories
1 भाईंदरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
2 मुंबई -अहमदाबाद महामार्गावर वाहनचालकाकडून गोळीबार
3 करचुकव्यांच्या २२३ मालमत्तांवर टाच
Just Now!
X