tapaschakraवागळे इस्टेट भागातील महिन्याभरापूर्वीचा प्रसंग. दुपारी दीडची वेळ होती. जुन्या पासपोर्ट कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावर एका महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडली होती. तिचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला होता. तिच्या शरीरावर जागोजागी चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केल्याच्या खुणा दिसत होत्या. भरदिवसा रस्त्यावरील हे दृश्य पाहून बघ्यांची तोबा गर्दी जमा झाली. त्यातल्याच कुणी एकाने माहिती दिल्यानंतर वागळे इस्टेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भरदुपारी ठाण्यासारख्या शहरात एका महिलेची हत्या झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. त्यांनी लागलीच तपास सुरू केला. एकीकडे मृतदेहाजवळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांनी गर्दीतील लोकांकडेही चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, गर्दीपैकी एकालाही ती महिला किंवा तिच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे मारेकऱ्याचा शोध घेण्यापूर्वीच मृत महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.
महिलेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळलेल्या पिशवीत मिठाईचा पुडा आणि एक पर्स होती. या पर्समध्ये आढळलेल्या बँकेच्या एटीएम कार्डावरही कुणाचे नाव नव्हते. म्हणून पोलिसांनी संबंधित बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा हे एटीएम किसननगर भागात राहणाऱ्या प्रियांका रोहिदास जगताप नावाच्या महिलेचे असल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी प्रियांकाच्या पत्त्यावर काही पोलिसांना पाठवून तिच्या कुटुंबियांना बोलावून घेतले. प्रियांकाचा मृतदेह पाहून जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुढील चौकशी सुरू
केली. आठ दिवसांपूर्वीच प्रियांकाचे कल्याणमधील प्रमोद खराडे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, एमएची परीक्षा
असल्याने त्यासाठी ती माहेरी आली होती. तिचा मृतदेह सापडला त्याच परिसरात तिची मावशी राहते. तिला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगूनच प्रियांका घराबाहेर पडली होती, अशी माहिती जगताप कुटुंबियांनी दिली.
मात्र, ही माहिती मारेकऱ्यापर्यंत नेण्यास पुरेशी नव्हती. म्हणून पोलिसांनी हत्या झाली त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्याचे ठरवले. यापैकी एका कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये प्रियांका एका व्यक्तीशी बोलत जात असल्याचे दिसून आले. परंतु, या व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यात अस्पष्ट दिसत होता. त्यामुळे पोलिसांचा तपास पुन्हा अडखळला. या हत्याप्रकरणाचा विविध अंगाने तपास करत असताना दीपेश परशुराम दोधडे नावाचा एक तरुण प्रियांकावर एकतर्फी प्रेम करत असल्याचे समोर आले. त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी लोकमान्य नगर येथील त्याचे घर गाठले. मात्र, तो घटना घडली त्या दिवसापासून बेपत्ता होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी दीपेशचा माग काढण्यास सुरुवात केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक श्रीरसागर, पोलीस निरीक्षक मदन पाटील, सुलभा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीरसागर आणि कदम, पोलीस हवालदार प्रकाश भोसले, पोलीस नाईक, चौधरी आदी पथके त्याचा शोध घेत होते. हत्येपूर्वी दीपेशने एका मित्राच्या मोटारसायकलचा वापर केला होता. ती दुचाकी त्याने भिवंडी परिसरात सोडली होती व स्वत: पुण्याला पळून गेला होता. मात्र, या मित्राने मोटारसायकल आणून देण्याविषयी सांगितल्यानंतर दीपेशला ठाण्यात यावे लागले. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दीपेशला बेडय़ा ठोकल्या. आपले प्रेम असतानाही प्रियांकाने दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यामुळेच तिची हत्या केल्याचे दीपेशने कबूल केले आहे. त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणींवर होणारे हल्ले आणि अत्याचार याच्या अनेक घटना रोज समोर येत असतात. प्रियांकाच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हालचाली करून तिच्या मारेकऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या प्रियांकाला परत बोलावणे कुणालाही शक्य नाही.