पण आपलं घर, राहतो ती इमारत अतिशय स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण या स्वच्छतेमध्ये सफाई कामगार, कचरा वेचक यांची अतिशय मोलाची भूमिका असते. याविषयी आपण खरंच किती जाणून असतो, ही विचार करण्याजोगी बाब आहे. जेव्हा डंपिंग ग्राऊंडच्या समस्येविषयी आंदोलनाच्या बातम्या येतात तेव्हा आपल्यासाठी ती एक बातमीच उरते. कारण आपल्याला त्याची झळ पोचत नसते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे की डंपिंग ग्राऊंडची समस्या ही भस्मासुराच्या रूपात देशासमोर उभी आहे.

ब्राझील, चीन, मेक्सिकोबरोबर भारताचा कचरा निर्माण करण्यात वरचा नंबर लागतो. घनकचरा व्यवस्थापन, त्याच्यावरील प्रक्रिया या कामांत १५ ते ३० लाख जण कार्यरत आहेत. त्यात बहुसंख्य दलित महिला आहेत. मात्र, कचरा वेचक, सफाई कामगार यांना त्यांच्या समस्यांसाठी लढावे लागत आहे, कारण आजही स्वच्छ हवा, पाणी, निवारा या जगण्यासाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असे अत्यंत कष्टप्रद, हलाखीचे जीवन ते जगत आहेत.

कल्याण येथील आधारवाडी डंपिंगजवळील (खरेतर डंपिंग ग्राऊंडवरीलच) अण्णाभाऊ साठेनगर वस्तीला भेट दिल्यावर आपण जगण्याचे अत्यंत कटू वास्तव अनुभवतो. डंपिंग ग्राऊंडवरील अंदाजे एक मजला उंचीच्या कचऱ्याच्या डोंगराच्या बाजूने असलेल्या कचऱ्याने आच्छादलेल्या अत्यंत गलिच्छ वाटेवरून या वस्तीत प्रवेश करावा लागतो. आत जाताना कचऱ्याच्या दरुगधीने पोटात ढवळून यायला लागते, डोके जड होऊ लागते आणि ही दरुगधी काही मिनिटांसाठी सोसणे आपल्या खरोखर आवाक्याबाहेरचे असते. आपल्या सर्व क्षमतांची इथे खरोखर कसोटी लागते. जाताना आपण किती प्रकारचा कचरा टाकतो ते सहज कळून येते. कारण छोटी मुले-मुली (साधारण ८-१० वर्षांची) एका लोखंडी सळईने सगळ्या शहराने टाकलेल्या घाणीचे वर्गीकरण करीत असतात. पिशव्या, बाटल्या, थर्मोकोल, चपला इ. यातही प्रसाधनांचे डबे, तुटलेले रिमोट/ किंवा या गटातल्या गोष्टींना अधिक मागणी असते. त्याला साधारणपणे ८० ते ९० रु. किलो भाव मिळतो. मुले, मुली आणि महिला अतिशय कौशल्याने आणि वेगाने जे काम करीत असतात ते पाहून आपण थक्क होतो. तिथेच एक भेळवाला आणि ती भेळ खाणारी चिल्लरपिल्लर पाहून, जगण्याचे हे विरूप प्रतिबिंब पाहून अक्षरश: सुन्न होऊन जातो. मेगासिटी, स्मार्टसिटी, मुंबईचे शांघाय, गरिबांच्या कल्याणासाठी काही कोटींची योजना इ. अनेक मथळे डोळ्यासमोर तरळू लागतात. मुलांच्या क्षमतांचा विकास, क्षमताधिष्ठित शिक्षण, मुलांचा सर्वागिण विकास, आनंददायी शिक्षण इ. आपल्या मुलांना मिळावे म्हणून चाललेला आपल्या जीवाचा आटापिटा आपण आठवू लागतो. आणि इथे ही छोटी मुले कचऱ्यातून इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होती. एकाच नाण्याच्या दोन बाजू!

समाजातील काही सजग, संवेदनशील व्यक्ती अत्यंत जागरूकपणे सभोवतालच्या परिस्थितीचे खऱ्या अर्थाने अवलोकन करीत असतात आणि मग समाजाची निकड लक्षात घेऊन आपले कार्यक्षेत्र निश्चित करतात. रिझव्‍‌र्ह बँकेतून निवृत्त झालेल्या विद्याताई धारप यांनी निवृत्तीनंतर आपल्या वेळेचा सदुपयोग करताना सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे ठरवले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला लागून असलेल्या वस्तीमधील मुलांच्या शिक्षणाची स्थिती खूप बिकट आहे हे त्यांना पक्के माहीत होते. या वस्तीत जाऊन तेथील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे ध्येय विद्याताईंना खुणावू लागले. खरेतर शिक्षणासाठी पोषक वातावरणाचा अभाव असलेल्या या वस्तीत मुलांना अक्षर ओळख करून पावसातही वर्ग घेण्यासाठी जातात. सध्या साठेनगरातील ती खोली घुशींनी पोखरली आहे आणि तेथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. आहे ती फक्त या सर्व मंडळींची प्रखर इच्छाशक्ती!

खरेतर हे काम खूप आव्हानात्मक आहे. कारण पालकांना आपण जसे जगलो तसे मुलांनी जगू नये असे वाटते. पण रोजचे जगणेच संघर्ष असल्याने त्यांनाही मर्यादा आहेत. मुलांच्या उपस्थितीत सातत्य नसते, त्यामुळे शिकवण्यात अनेक समस्या येत राहतात. इ. ४थीतल्या मुलांना अगदी मुळाक्षरांपासून सुरुवात करावी लागते. गणित, विज्ञान इ. विषय शिकवणे ही या मंडळींसाठी परीक्षाच असते. गुरू-शुक्र इथे संस्कारवर्गाअंतर्गत विविध स्तोत्रे, कविता, गोष्टी इ.मधून मुलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने या मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, दप्तर किंवा हुशार मुलांच्या शिकवणी वर्गाची फी अशाप्रकारे मदत केली जाते. या मुलांना सर्कस, जत्रा बघायला, मुंबई दर्शनची मजा अनुभवायला, मेट्रोमधून फिरायलाही नेण्यात येते. पण वयाच्या ७व्या-८व्या वर्षी कचरा विकून ५०-६० रुपये मिळवणाऱ्या या मुलांना शिकून खूप मोठं बनता येतं, हे पटवणं विद्याताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खरोखरच आव्हान आहे. ध्येय निश्चित असले तरी ध्येयनिश्चितीकडे जाणारी वाट अवघड आहे, ही या मंडळींना जाणीव आहे. पण अवघड वाट निवडलेल्यांना त्यावर चालण्याचे भय नसते. कारण त्यांना त्यांचे ध्येय (या वस्तीतील २-३ मुलांनी तरी १०वी उत्तीर्ण व्हावे) हे सातत्याने खुणावत असते. या सर्व ध्येयप्रेरित मंडळींना, त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होईल असा विश्वास वाटतो.