जुचंद्र गावात गणेश विसर्जनात शिस्तबद्धतेचे अनोखे दर्शन

गणेश विजर्सनाच्या वेळे प्रत्येक गणेशोत्सव मंडळ, गणेशोत्सव साजरा करणारी प्रत्येक सोसायटी स्वतंत्र मिरवणूक काढते. त्यामुळे सर्वत्र धांगडधिंगा, कानठळ्या बसविणारा आवाज यांचा अतिरेक होतो. मात्र वसईतील जुचंद्र या गावाने परपंरा आणि शिस्तीचे दर्शन घडवत एक अनोखी प्रथा जपली आहे. गावामध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांकडून वेगवेगळी मिरवणूक काढण्यात येत नाही. तर घरी गणपती बसवणाऱ्या प्रत्येकाकडून एकच मिरवणूक काढून एकाच ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या गावाने ही प्रथा जपली असून, त्यामुळे धांगडधिंगा आणि ध्वनिप्रदुषणाला या गावाने तिलांजली दिली आहे.

नायगावजवळली जुचंद्र हे गाव स्वातंत्र्य सैनिक आणि कलावंतांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावात आग्री आणि कोळी ही स्थानिक भूमिपुत्र राहतात. पंरपरा जपणे हे गावाचे वैशिष्ट. गावात १००हून अधिक घरगुती गणपती आहेत. गणेशमूर्ती प्रामुख्याने शाडूच्या आणि गावातीलच मूर्तीकारांनी बनवलेल्या असतात. रविवारी झालेल्या सात दिवसांच्या गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत त्याचा प्रत्यय आला. गावातील घरगुती गणपती आणि गौरी बसविणारे संध्याकाळी साडेपाच वाजता दारात गणपती घेऊन उभे होते. दत्त मंदिरापासून मिरवणूक निघाली. विसर्जन मिरवणूक प्रत्येकाच्या घरासमोर जाताच लोक आपापले गणपती, गौरी घेऊन त्याला सामिल झाले. त्यामुळे कुणाचीही स्वतंत्र मिरवणूक किंवा बॅण्ड पथक नव्हते. महिलांनी पारंपारिक वस्त्र परिधान करून डोक्यावरून गौरी-गणपती विसर्जनासाठी नेण्यात येत होते. विशेष म्हणजे एकच पारंपारिक वाद्य वाजवणारे पथक होते. साडेसहा वाजता गावातील तलावाजवळ सगळे एकत्र जमले. एकच सामुदायिक आरती झाली आणि एकाच वेळी सर्व गणपतींचे विसर्जन झाले. सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम आटोपला. धार्मिक सेवा मंडळातर्फे याचे आयोजन केले होते.

पूर्वीपासून ही पद्धत सुरू  आहे. हल्ली बाहेरचे लोक गाव परिसरात राहायला आल्याने ते सातनंतर विसर्जन करतात. परंतु गावातील सर्वच लोक एकाच वेळी विसर्जन करून शिस्त आणि पारंपारिकतेचे दर्शन घडवतात.

– सुधीर भोईर, ग्रामस्थ

आम्ही गणेशोत्सव काळात पारंपारिकता जपतो. कुठल्याही थिल्लर गोष्टीला थारा देत नाही. आमच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्वी पोलीस बंदोबस्तही नसायचा. आता संरक्षण म्हणून बंदोबस्त केला जातो. या मिरवणुकीत शिस्तीला खूप महत्त्व आहे1

– जयेश म्हात्रे, ग्रामस्थ