कोंडीवर उपायासाठी एकरेषीय वाहनतळाचा निर्णय; रेषेबाहेरच्या वाहनांवर कारवाई करणार

उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडीवरील नियंत्रणासाठी आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना  एका रेषेत वाहने उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक आमदार, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेषेबाहेर वाहने उभी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

उल्हासनगर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्यावर गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर कोंडी वाढली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर फॉरवर लाइन, शिवाजी चौक, सतरा सेक्शन, शांतीनगर या भागंतील चौकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुकानांबाहेर वाहने उभी केली जातात.

अनेकदा वाहनांच्या दोन रांगा लागतात. त्यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहत नाही आणि येथे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. या रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी पालिकेच्या निधीतून तीन चौकांमध्ये लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. मात्र रस्त्यावरील दुहेरी पार्किंगमुळे होणारी कोंडी कशी कमी होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, ही कोंडी टाळण्यासाठी स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात नुकतीच पोलीस आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा एकरेषीय पार्किंगला परवानगी देण्यावर एकमत झाल्याची माहिती आयलानी यांनी दिली. उल्हासनगर शहर व्यापारी शहर असून शहरात दररोज हजारो छोटीमोठी वाहने येत असतात. किरकोळ व्यापारी, ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी करण्यास मनाई केली तर त्याचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर सरसकट कारवाई करण्याऐवजी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंगची व्यवस्था निर्माण करून देण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंगसाठी एक रेषा आखली जाणार आहे. त्या रेषेबाहेर वाहन उभे असेल तर त्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे पार्किंग आणि वाहतूक कोंडी अशा दोन्ही समस्या सुटतील, असा दावा कुमार आयलानी यांनी केला आहे.

उल्हासनगरातील सिरू चौक ते नेहरू चौकामध्ये यापूर्वी एक रेषेत पार्किंगचा प्रयोग राबविण्यात आला असून त्याचा फायदा या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे कल्याण-बदलापूर रस्त्यावरही असाच प्रयोग राबविण्यात येणार असून त्यामुळे येथील कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. तसेच कारवाईवेळी होणारे वादही कमी होतील.

– श्रीकांत धरणे, पोलीस निरीक्षक, वाहतूक