News Flash

मुसळधार पावसात ठाण्यातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघींचे मृतदेह अखेर सापडले

ठाण्यात वाहून गेलेल्या ८ पैकी ७ जणांचे मृतदेह मिळाले

मुसळधार पावसात ठाण्यातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघींचे मृतदेह अखेर सापडले
दीपाली बनसोडे आणि गौरी जयस्वाल यांचे छायाचित्र

मंगळवारी रात्री म्हणजेच २९ ऑगस्टच्या रात्री ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये काम करणाऱ्या दीपाली बनसोडे या मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह आज विटावा येथील नाल्यात सापडला आहे. कोरम मॉलच्या शेजारी असलेल्या संभाजी नगर या भागातील गौरी जयस्वाल ही १३ वर्षांची मुलगीही वाहून गेली होती, या मुलीचा मृतदेहही कळवा खाडीत सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाण्यातून वाहून गेलेल्या एकूण ८ पैकी ७ जणांचे मृतदेह सापडले असून अजय उर्फ मिनू आठवाल हा अजून बेपत्ता आहे. त्याचा शोध महापालिकेच्या ४० कर्मचाऱ्यांकडून घेतला जातो आहे.

ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव भागात राहणाऱ्या दीपाली बनसोडे या कोरम मॉलमधील स्टार बाझारमध्ये एका काऊंटरवर काम करत होत्या. मंगळवारी पावसाचा जोर वाढला तेव्हा आपले काम संपवून त्या आपल्या नवऱ्याशी बोलत मॉलमधून बाहेर पडल्या. बाहेर पडत असलेल्या मुसळधार पावसाची कल्पनाही त्यांनी त्यांच्या नवऱ्याला दिली, तसेच त्यांनी त्यांचा नवरा विशाल याला घ्यायलाही बोलावले. ठरल्याप्रमाणे विशाल आला पण त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. त्यामुळे दीपाली बनसोडे यांचा नवरा विशाल याने दीपाली बनसोडे यांना रस्ता ओलांडून पलिकडे येण्याची विनंती केली.

दीपाली बनसोडे रस्ता ओलांडत असतानाच एक ट्रक त्यांच्या समोरून गेला, त्यानंतर दीपाली बनसोडे पाण्यात पडल्या आणि अचानक वाहून गेल्या. नवऱ्यासोबत मोबाईलवर असलेला त्यांचा संपर्क अवघ्या काही क्षणात तुटला. दीपाली बनसोडे बेपत्ता झाल्या होत्या दोन दिवसांच्या शोध कार्यानंतर त्यांचा मृतदेह आज विटावा येथील नाल्यात सापडला.

आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या पथकाला १३ वर्षांच्या गौरी जयस्वालचा मृतदेह कळवा खाडीत सापडला आहे. तर अजय उर्फ मिनू आठवाल हा अजूनही बेपत्ता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अजय हा त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या ९ वर्षांच्या मुलीला वाचविण्यासाठी गेला होता. त्याचा शोध ४० कर्मचाऱ्यांकडून घेतला जातो आहे. अजय हादेखील पाण्यातच वाहून गेला आहे. त्याचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी बुधवारी काही लोकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 8:29 pm

Web Title: one woman and one girls body were found in the kalwa
Next Stories
1 कल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळली, ३ जण गंभीर जखमी
2 रेल्वे स्थानकांवर ‘घरवापसी’ची घाई
3 उंचावरचे ठाणेही तुंबले!
Just Now!
X