|| ऋषीकेश मुळे

राज्यातून आवक वाढल्याने बाहेरील कांद्याला मागणी नाही

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकावर परिणाम होऊन किरकोळ बाजारात काद्याने शंभरी गाठली होती. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त आणि तुर्कीतून कांद्याची आयात जेएनपीटी बंदरात करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिनाभरात राज्यातील कांद्याची आवक वाढल्यामुळे परदेशातून मागविलेल्या कांद्यांपैकी तब्बल ७ हजार टन कांदा जेएनपीटी बंदरात पडून असल्याचे समोर आले आहे. २५० हून अधिक कंटेनरमध्ये साठवून ठेवलेला हा कांदा आता सडू लागल्याने परिसरात दरुगधी पसरू लागली आहे.

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने इजिप्त आणि तुर्कीतून कांदा मागविला होता. हा साठा उपलब्ध झाल्यामुळे किरकोळ बाजारात या कांद्याची विक्री २० ते ३० रुपये किलोपर्यंत होत होती. हा कांदा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे त्याची आवक वाढविली. मात्र  महिनाभरात राज्याच्या विविध भागांतून कांद्याची आवक वाढली .त्यामुळे परदेशातून मागविलेल्या कांद्याच्या साठय़ापैकी तब्बल ७ हजार टन कांदा जेएनपीटी बंदरात पडून असल्याचे चित्र आहे.

हा कांदा जेएनपीटी येथील २५० कंटेनरमध्ये ठेवण्यात आला असून तो आता सडू लागला आहे. त्यामुळे सीएफएस (कंटेनर फेट्र स्टेशन) परिसरात  दरुगधी पसरली आहे, असे घाऊक कांद्याचे व्यापारी सी. रामाने यांनी सांगितले. काही कांद्यांना मोठा कोंब आल्यामुळे तर काही कांदा सडल्यामुळे तो फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

इजिप्त आणि तुर्की या देशातून महाराष्ट्रात आयात करण्यात आलेल्या कांद्याला ग्राहकांकडून नापसंती असल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हा कांदा चवीला कडवट लागत असल्यामुळे ग्राहक या कांद्याला पसंती देत नाहीत. तसेच हा कांदा पातळ भाजीत वापरल्यास भाजीला काळसर रंग येत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे ग्राहक हा परदेशी कांदा विकत घेण्यास फारसे तयार नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या राज्यातील कांद्याची आवक मुबलक प्रमाणात होत असून ग्राहकांना परवडेल अशा दरात कांद्याची विक्री होत आहे. मध्यंतरी मोठय़ा प्रमाणावर आलेला परदेशी कांदा विकत घेण्याऐवजी आता सर्वसामान्य नागरिकांसह, हॉटेलचालक महाराष्ट्रातील कांदा विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत.  – के. आर. पवार,  कांदा बटाटा विभाग अधिकारी, वाशी बाजार समिती