News Flash

कांद्याच्या दरांची उसळी

घाऊक बाजारात किलोमागे पाच रुपयांची वाढ

(संग्रहित छायाचित्र)

पूर्वा साडविलकर

पाऊस आणि कांदा भजी हे ठरलेले समीकरण. पावसाला सुरुवात झाल्यामुळे घरी, हॉटेलांत, खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर कांदा भजीच्या फर्माइशी वाढल्या आहेत. मात्र, हा आनंद फार काळ टिकण्याची शक्यता नाही. कारण गेल्या पंधरवडय़ापासून राज्यभरातून मुंबई, ठाण्याला होणारी कांद्याची आवक रोडावली असून घाऊक बाजारा कांद्याचे दर किलोमागे पाच रुपयांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारातही उत्तम प्रतीचा कांदा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे.

जून महिन्यामध्ये पुणे, जळगाव आणि नाशिक परिसरात कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने मुंबई आणि ठाणे शहरात कांद्याची आवक  घटू लागते असा दरवर्षीचा अनुभव आहे. पावसाळ्यात बराचसा ओला कांदा शहरी भागात येत असल्याने व्यापारी पूर्वी साठवणीतील सुका कांदा या काळात विक्रीसाठी काढतात.

या कांद्याचे दर नेहमीपेक्षा अधिक असतात. यंदाही असाच प्रकार घडू लागला असून नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातून मुंबई तसेच आसपासच्या परिसरास होणारी कांद्याची आवक कमी होऊ लागल्याने दरही वाढू लागले आहे. सद्यस्थितीत वाशी आणि कल्याण घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा १६ रूपये दराला पोहोचला असून किरकोळ बाजारात ३० रूपयांनी विक्री सुरु झाली आहे. गेल्या महिन्यात किरकोळीत उत्तम प्रतीचा कांदा २५ रुपयांनी विकला जात होता. साधारण प्रतीच्या कांद्याचे दर १५ रुपये ते २२ रुपयांच्या घरात होते. आता किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ३० रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

यावर्षी वातावरणाचा परिणाम कांद्यावर झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवाक कमी झाली आहे. कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांदाभजीचे दर वधारले आहेत.

– निलेश शेट्टी, कांदाभजी विक्रते आवक घटली

यावर्षी वाढलेल्या तापमानाचा परिणाम पुणे, जळगाव, आणि नाशिक येथील कांदा उत्पादनावर झाला आहे. मूंबईस होणारी आवक गेल्या एक महिन्यांपासून कमी झाल्याचे कांदा व्याराऱ्यांकडून सांगण्यात आले. तापमान वाढल्याने यंदाच्या कांद्याचा दर्जा ही खालावला आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला जून महिन्यात दररोज १०० ते १२० कांद्याच्या गाडय़ा येत होत्या. मात्र, सध्या दररोज ८० ते ९० गाडय़ा बाजारात येत आहेत. कांद्याची आवाक बाजारात कमी होत असल्यामुळे कांद्याचे भाव वधारले असल्याचे कांदा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

भजीही महागली

किलोमागे ५ रुपये वाढल्याने याचा परिणाम कांदा भजींवर झाल्याचा पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरु झाल्यावर खवय्यांचा मोर्चा कांदा भजींकडे वळतो. मात्र, जून महिन्यात २५ रुपये प्लेट दराने विकली जाणारी कांदा भजी सध्या ३० रुपये दराने विकली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:19 am

Web Title: onion prices up 5 rupees abn 97
Next Stories
1 निसर्ग पर्यटनावर निर्बंध
2 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण ठाकुर्लीदरम्यान तांत्रिक बिघाड
3 मृतदेहाच्या हातातून सोन्याची अंगठी गायब, ठाण्यात डॉक्टर-नर्सविरोधात गुन्हा
Just Now!
X