आवक ५० टक्क्यांनी घटली; किलोमागे १० रुपयांची वाढ

ठाणे : राज्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजारात कांद्याची आवक ५० टक्क्य़ांनी रोडावली आहे. त्यामुळे आठवडय़ाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. वाशी येथील बाजार समितीच्या घाऊक आवारात उत्तम प्रतीच्या कांद्याच्या दरात किलोमागे दोन ते चार रुपयांनी तर किरकोळीत थेट दहा रुपयांनी कांदा महागला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, नाशिक जिल्ह्य़ातून कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो. या बाजारात दररोज सरासरी १०० ते १५० कांद्याच्या गाडय़ा दाखल होतात. आठवडय़ाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्य़ांना बसला. या अतिवृष्टीमुळे कांद्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सध्या शेतकऱ्यांकडून साठवणुकीतला कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. परिणामी बाजारात कांद्यांची आवक ५० टक्क्य़ांनी घटली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ७० ते ८० कांद्याच्या गाडय़ा दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. त्यामुळे घाऊक बाजारात आठवडय़ाभरापूर्वी १६ ते २२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा सध्या १९ ते २३ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात अतिवृष्टीच्या नावाखाली कांद्याच्या दरात आठवडय़ाभरात दहा रुपयांनी वाढ केली असून २५ रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा ३५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे.

उपाहारगृहांमध्ये कांद्याचा वापर कमी

खाद्यतेलाचे दर स्थिरावत नाहीत, तोच आता कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे दर वधारल्याने ठाण्यातील उपाहारगृहचालकांनी विविध पदार्थामध्ये करण्यात येत असलेला कांद्याचा वापर कमी केला आहे. टाळेबंदीमुळे आधीच उपाहागृहचालकांचा व्यवसाय थंड पडला होता. त्यात आता महागाईमुळे पदार्थाचे दर वाढविले तर, ग्राहक पुन्हा उपाहारगृहांकडे पाठ फिरवतील या कारणाने अनेक उपाहारगृहचालकांनी पदार्थाच्या दरांत वाढ केलेली नाही, अशी माहिती उपाहारगृहचालक नीलेश शेट्टी यांनी दिली.

आठवडय़ाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्यांची बाजारात आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे.

– राजेश तांबटकर, कांदे विक्रेते, ठाणे</strong>