ऑनलाइन स्पर्धात वाढ; विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे

आशीष धनगर, मानसी जोशी

ठाणे : पब्जी या खेळाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना या खेळाच्या ऑनलाइन स्पर्धाना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे.

‘प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड’ अर्थात पब्जी हा ऑनलाइन खेळ पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे.  रोज रात्री १० ते २ या वेळेत अनेक यूटय़ूब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत.  त्यांना संकेतस्थळांच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.

समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकेतवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

– डॉ. अरविंद देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ

अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो तसेच पबजीबाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या यूटय़ूब वाहिनीवर सांगत असतो.

– श्रीमान लेजंड, पबजी स्टार

स्पर्धेचे आयोजन

* स्पर्धेसाठी ऑनलाइन वॉर रूम तयार करण्यात येते.स्पर्धा ती तीन ते चार तास चालते. शेवटी ऑनलाइन जिवंत राहणाऱ्या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळते.

* मोठय़ा पब्जी स्पर्धा जागतिक पातळीवर खेळल्या जातात. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्याला थेट पबजी फोरमतर्फे जागतिक पातळीवरच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. समुहानेही सहभाग घेता येतो.