मागणी वाढल्याने बाजारात मोबाइल फोनचा तुटवडा

भाईंदर : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाकडून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. परंतु ऑनलाइन शिक्षण घेण्याकरिता उत्तम प्रकारच्या मोबाइल फोनची गरज भासत असल्यामुळे नागरिकांकडून पुन्हा चिनी कंपनीच्या उत्पादनातील मोबाइल फोनला पसंती देण्यात येत आहे. यामुळे बाजारात तुलनेने स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या चिनी मोबाइलच्या मागणीत वाढ झाली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून देशात करोनाचे संकट असल्यामुळे शालेय विध्यार्थ्यांच्या शाळा भरणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास अधिक भर देण्यात येत आहे. याकरिता राज्य तसेच केंद्र शासनाकडून निरनिराळ्या उपाययोजना आखून त्यावर काम करण्यात येत आहे.

अशा वेळी मुंबई तसेच उपनगरात अनेक खाजगी शिकवण्या भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांकडे लॅपटॉप, संगणक आणि  मोबाइल फोनचा तुटवडा असल्यामुळे या यंत्रसामुग्रीच्या मागणीत भर पडली आहे. यात मोबाइल हा पर्याय इतर सामुग्रीच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे नागरिकांची मोबाइल विक्रेत्यांकडे मागणी वाढली आहे. शिवाय इतर मोबाइल फोनच्या तुलनेत चिनी कंपन्यांचे फोन हे स्वस्त असल्यामुळे नाइलाजाने गरीब तसेच मध्यवर्गीय नागरिकांकडून त्याच फोनची मागणी अधिक होत आहे. गेल्या महिनाभरात मागणी अधिक वाढली असल्यामुळे विक्रेत्यांकडे मोबाइल फोनचादेखील तुटवडा निर्माण झाला असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

खिशाला परवडणार असल्याने मागणी

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांचे उत्पन्न  बंद पडले आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ  नये म्हणून अनेक पालक ऑनलाइन शिक्षण देण्याकरिता यंत्रसामुग्री खरेदी करत आहेत. यात लॅपटॉप, संकणकाच्या तुलनेत मोबाइल फोनचा पर्याय निवडला जात आहे. शिवाय इतर कंपन्यांच्या तुलनेत चिनी कंपन्यांचे मोबाइल स्वस्त आणि रास्त असल्यामुळे अखेर याच मोबाइलच्या मागणीत वाढ होत असून बाजारात तुटवडा निर्माण झाला असल्याचे आढळून आले आहे.

टाळेबंदीनंतर दुकाने उघडल्यावर मोठय़ा प्रमाणात मोबाइल विक्रीत भर पडली आहे. परंतु यात चिनी मोबाइल फोनचे दर स्वस्त असल्यामुळे ग्राहक तेच घेत आहेत. शिवाय आम्हाला पुढून येणारा माल कमी झाल्यामुळे चिनी मोबाइलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

 – नारायण, मोबाइल विक्रेता