करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचवी ते आठवीचे वर्ग अनिश्चित काळासाठी बंद

वसई : वसई विरार शहरात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.त्यामुळे  सुरू करण्यात आलेले पाचवी ते आठवी पर्यँतचे वर्ग अनिश्चिात काळासाठी बंद करण्यात आले आहेत. यासाठी शहरातील शाळांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण देण्यावर शाळांनी भर दिला आहे.

मागील वर्षी करोनाचे सावट असल्याने वसई विरार शहरातील शाळा सुरू झाल्या नव्हत्या त्यामुळे ऑनलाइन स्वरूपात शिक्षण सुरू ठेवले होते. परंतु करोनाचे संकट निवळताच सर्व काही पूर्वपदावर आणताना २०२१ च्या सुरवातीला नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर पाचवी ते आठवीचे    वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तासिका घेतल्या जात होत्या.

परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा राज्यात व शहरातील विविध ठिकाणच्या भागात करोना कहर वाढू लागला आहे. याला रोखण्यासाठी  पालिकेने आदेश काढून पाचवी ते आठवी पर्यँतच्या शाळांवर पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागातील शाळांनी पुन्हा ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला आहे. या ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारच्या विषयांच्या तासिका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. आणि विद्यार्थी देखील पुन्हा ऑनलाइन शिक्षण घेण्यात मग्न झाल्याचे चित्र दिसून आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जो अभ्यासक्रम शाळेत सुरू होता तोच अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.  परंतु ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल व इंटरनेट सुविधा आहे असं नाही त्यामुळे यातून फक्त ५० ते ६० टक्केच विद्यार्थ्यांना शिक्षण देता येत असल्याचेही शिक्षकांनी सांगितले आहे.

ग्रामीणमध्ये शाळा सुरू

वसई तालुक्याचा परिसर हा शहरी व ग्रामीण अशा दोन भागात येत असून वसईत एकूण ९६९ शाळा येत आहेत. यातील ९० टक्के शाळा या शहरी भागात आहेत. तर १० टक्के ग्रामीण भागात येत आहेत. शहरी भाग हा महापालिकेत येत असल्याने शहरी भागातील पाचवी ते आठवी पर्यँत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु ग्रामीण साठी अजूनही कोणत्याही प्रकारचा आदेश न आल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी दिली आहे.