महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची इंटरनेट सुविधा दोन दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना ऑनलाइन वीज देयक भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे देयक संकलन केंद्रात ग्राहक गर्दी करीत आहेत.

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची इंटरनेटद्वारे चालणारी वीज देयक भरणा सुविधा बंद आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच हा प्रकार घडल्याने अनेक ग्राहकांची गैरसोय झाली आहे. त्यांना रांगेत उभे राहून देयक भरावे लागत आहे. त्यामुळे वीज देयक भरणा केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड, नौपाडा, पाचपाखाडी या भागांत या समस्येची तीव्रता अधिक आहे.

२८.३४ टक्के ग्राहकांकडून सेवेचा वापर

संपूर्ण ठाणे शहरात ९४ लाख ४० हजार ६१ नागरिक वीज देयक भरतात. त्यातील २६ लाख ७६ हजार नागरिक ऑनलाइन वीज देयक भरतात. म्हणजेच २८.३४ टक्के नागरिक ऑनलाइन बिल भरत असल्याची माहिती महाराष्ट्र विद्युत महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. मात्र बुधवारी सेवा सुरळीत झाली आहे. त्यामुळे देयक भरण्यात अजूनही अडचणी येत असल्यास ती स्थानिक नेटवर्कची समस्या आहे. सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची इंटरनेट सेवा वापरण्यात येत आहे.

विश्वनाथ भोसले, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ