पुस्तक वाचायचे तर आहे, परंतु जवळपास ग्रंथालय नाही. विशेषत: वृद्धांना घरातून बाहेर पडता येत नसल्याने वाचनाची आवड असूनही त्यांना पुस्तके वाचता येत नव्हती. यावर उपाय म्हणून पै फ्रेण्ड्स लायब्ररीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. या ऑनलाइन सुविधेचा लाभ सध्या दोन हजार ग्राहक घेत असून दिवसाला पाचशे ते सातशे पुस्तक वाचली जात आहेत. ज्यांना संगणक वापरता येत नाही, त्यांच्यासाठी दूरध्वनीची सुविधाही उपलब्ध आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा येत्या महिन्यात संपतील, तसेच शालांत परीक्षाही पुढील महिन्यात संपतील. त्यानंतर शाळांना सुट्टी लागल्यावर ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांची संख्या जास्त असते. मात्र असे अनेक वाचक आहेत, त्यांच्या जवळपास ग्रंथालय नाही. काही ग्रंथालयात कमी पुस्तके असतात, तर काही ज्येष्ठ नागरिकांना वाचनाची आवड असूनही ग्रंथालयात येता येत नाही. ही समस्या लक्षात घेऊन पै फ्रेण्ड्स लायब्ररीने २००८ मध्ये ऑनलाइन सुविधा सुरूकेली.
याविषयी पुंडलिक पै म्हणाले काही लोक सायकलवरून पुस्तके ग्राहकांना घरपोच पोहोचविताना मी पाहिली. त्यामुळे आपणही ग्राहकांना अशा स्वरूपाची सुविधा देऊ शकतो. आमच्याकडे खूप पुस्तके असून त्याचा लाभ सर्वाना घेता यावा, यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली. सुरुवातीला फक्त ८०० पुस्तके उपलब्ध होती. आता पुस्तकांची संख्या ३५ हजारांच्या घरात गेली आहे. ९१६७७७१०२९/ १०२७/१०२८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.‘फ्रेण्ड्सलायब्ररी.इन’ या नावाने सुरूकेलेल्या या संकेत स्थळाला सुरुवातीला फार कमी प्रतिसाद मिळाला. आता दोन हजारांच्या आसपास सभासद आहेत.