|| कीर्ती केसरकर

विक्रेत्यांचे नुकसान; बाजारात ३०० रुपयांपर्यंत राख्या

रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला असून विविध प्रकारच्या राख्या बाजारात आल्या आहेत, मात्र ऑनलाइन राख्या खरेदीचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील महिनाभरापूर्वीच बाजारात राख्या येऊ लागल्या होत्या. पाच रुपयांच्या राखीपासून ते ३०० रुपयांच्या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात धाग्यांच्या राख्या, लहान मोठय़ा, कार्टूनच्या राख्या, मोठय़ांसाठी कलश, स्वस्तिक, ओम अशा राख्या तर वाहनांसाठी छोटा भीम, टॉम अ‍ॅण्ड जेरीसारख्या विविध राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तर या राख्या अगदीच कमी म्हणजे ५० ते ६० रुपये दरात उपलब्ध आहेत.

एकीकडे बाजारात वैविध्यपूर्ण राख्या असताना घरबसल्या राख्या मागविता याव्यात यासाठी ऑनलाइन राख्या मागविण्याकडेही कल वाढलेला आहे. ऑनलाइनवर सध्या मेटलच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. ‘ब्रो’, ‘भाईजान’, ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’ असे लिहिलेल्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. तर ऑर्डर देऊन फोटोच्या व नावाच्या राख्यादेखील बनवून मिळत असल्याने नागरिकांची पसंती ऑनलाइनला जास्त मिळत आहे, परंतु या राख्यांची किंमत जास्त म्हणजे ३५० ते ८०० दरम्यान आहे. राख्यांसोबतच रक्षाबंधनाशी संबंधित अनेक वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी आलेल्या आहेत. त्यात उशी, कप, कपडेदेखील पाहायला मिळतात. ‘मेरा भाई’, ‘मेरी प्यारी बेहेन’, ‘नटखट भाई’, भाऊ -बहिणीच्या नात्याशी निगडित वाक्य लिहिलेले कपडे, कपदेखील उपलब्ध आहेत.

बाजारात राखीविक्रेता रक्षाबंधनच्या काळात ५००० ते ८००० कमवायचा. मात्र, ऑनलाइनमुळे मागणीत घसरण झाली आहे.

गेल्या महिन्याभरात राखी विक्रेत्यांची २५०० ते ३००० इतकीच कमाई झालेली आहे. तर ऑनलाइन विक्रेत्यांना या वेळी चांगलाच फायदा झालेला आहे. पाऊस असल्यामुळेदेखील नागरिकांना बाहेर पडून राख्या विकत घेणे शक्य होत नसल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे.

पसंतीच्या राख्यांचा बाजारात अभाव

नागरिक ऑनलाइन राखी बघून येतात व तशीच राखी मागतात. जर तशी उपलब्ध नसेल तर राखी घेत नाहीत. नागरिकांची ऑनलाइनसाठीची पसंती वाढत असल्याने नुकसान होत आहे, असे हंसा देसाई या राखी विक्रेत्याने सांगितले. फक्त सामान्य महिला राखी बाजारातून घेतात. महाग राखी घेणाऱ्या महिला ऑनलाइनवर राख्या घेतात. त्यामुळे एका ग्राहकाकडून जास्त काहीच मिळत नाही, अशी खंत बद्री सिंग या राखी विक्रेत्याने व्यक्त केली.

ऑनलाइन राख्यांमध्ये विविधता

पावसाळ्यात बाहेर पडणे शक्य होत नाही. तसेच कामातूनदेखील वेळ मिळत नाही. मोबाइलमध्ये बघता बघता राखी ऑर्डर करता येते, म्हणून ऑनलाइन राखी मागवते, असे सुषमा पाटील यांनी सांगितले. ऑनलाइन राख्यांमध्ये विविधता आहे. आजच्या पिढीला अवडण्यासारख्या राख्या असल्याने ऑनलाइन राख्या मागवते असे मिताली साळगावकर हिने सांगितले.