News Flash

क्रिकेट, नृत्य, अभिनयाचे ऑनलाइन धडे

टाळेबंदीमुळे डिजीटल पद्धतीने उन्हाळी शिबिरे

टाळेबंदीमुळे डिजीटल पद्धतीने उन्हाळी शिबिरे

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : शालेय परीक्षा संपल्या की अनेक विद्यार्थ्यांना वेध लागतात विविध उन्हाळी शिबिरांचे. विविध कला, नृत्य, अभिनय, क्रीडा यांचे प्रशिक्षण या उन्हाळी शिबिरांमधून दिले जाते. मात्र सध्या टाळेबंदी असल्याने अनेक संस्थांना ही शिबिरे घेता येत नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अनेक संस्थांनी उन्हाळी शिबिरांचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.

‘वर्षभर विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाचे मार्गदर्शन सुरू असते. मात्र टाळेबंदीमुळे मैदानात जाता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. त्यांना क्रिकेटविषयक माहितीचे प्रश्न विचारले जाऊन त्याची उत्तरे देण्यास सांगितले जाते. क्रिकेटपटूंच्या फलंदाजी, गोलंदाजीच्या चित्रफिती पाठवून त्याचे निरीक्षण करण्यास सांगून तो फलंदाज, गोलंदाज काय चुकला याचे निरीक्षण नोंदविण्यास सांगून त्या विद्यार्थ्यांचा क्रिकेट खेळातील बुद्धय़ांक तपासला जात आहे. उत्तरातील त्रुटी त्यांना समजावून सांगितल्या जात आहेत. झोपेचे गणित आणि त्याचे क्रिकेटमधील फायदे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहेत,’ असे डोंबिवलीतील ‘बॉईज क्रिकेट क्लब’चे राजन धोत्रे यांनी सांगितले.

कला नृत्यकला मंदिर या संस्थेने कथ्थकचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. ‘कथक नृत्य कलेचे प्रशिक्षण मागील १८ वर्षांपासून सहा शाखांमध्ये दिले जाते. उन्हाळी सुट्टीत नृत्य शिबीर आणि त्याविषयक परीक्षा, नवीन प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले जाते. या वेळी प्रथमच प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नसले तरी ऑनलाइन वर्ग आपण सुरू केले आहेत. विद्यार्थिनींचे गट करून त्यांना नृत्यविषयक मार्गदर्शन केले जाते. कथ्थक नृत्याच्या चित्रफिती पाठवून नृत्य प्रकार शिकविले जातात. गांधर्व परीक्षेची तयारी आणि सराव घेतला जातो. सुट्टीचे दोन महिने फुकट जाऊ नये या उद्देशातून ऑनलाइन प्रशिक्षणावर भर दिला आहे,’ असे या संस्थेच्या संचालिका मानसी अत्रे यांनी सांगितले.

‘वेध’ अ‍ॅकॅडमीचे संकेत ओक यांनी सांगितले की, ‘वेध अ‍ॅकॅडमी आणि श्रीकला संस्कारच्या दीपाली काळे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षे सुट्टीकालीन अभिनय कार्यशाळा घेतो. दोन महिन्यांचे सुट्टीकालीन प्रशिक्षणाचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र टाळेबंदीमुळे सगळे नियोजन कोलमडले. विद्यार्थ्यांचा हिरमोड नको म्हणून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना गोष्ट सांगणे, प्रवासवर्णन, त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलायला सांगणे, तज्ज्ञांचे अनुभवकथन ऐकवितो.’

‘गिर्यारोहण उपक्रमात सुट्टीत विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी होतात. करोनामुळे दोन महिन्यांचे नियोजन कोलमडले. जुलैमध्ये लडाखचा गिर्यारोहण दौरा होता. सदस्यांनी त्यांची नोंदणी प्रतीक्षा यादीत करण्यास सांगितली. येथे प्रात्यक्षिकाला महत्त्व असल्याने ऑनलाइन काही करू शकत नाही,’ असे ‘हंग्री ट्रेक्स’ फाऊंडेशनचे आशु कापडसकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 3:56 am

Web Title: online summer classes for cricket dancing and acting zws 70
Next Stories
1 गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘भिवंडी पॅटर्न’
2 किराणा विक्रेत्यांकडून ग्राहकांची अडवणूक
3 टाळेबंदीमुळे नवउद्योजक संकटात
Just Now!
X