News Flash

भारतात माळढोकची संख्या जेमतेम दीडशे

महाराष्ट्रात यंदा एकाही पक्ष्याची नोंद नाही

वाढते शहरीकरण, पाणथळींचा नाश आणि प्रजनन स्थळांची कमतरता पक्ष्यांच्या मुळावर; महाराष्ट्रात यंदा एकाही पक्ष्याची नोंद नाही

एकेकाळी मोराऐवजी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ज्याचे नाव जाहीर करण्याच्या हालचाली सुरू होत्या तो ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ अर्थात माळढोक पक्षी आता भारतातूनच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागाचे वाढते शहरीकरण, पाणथळींचा नाश आणि प्रजनन स्थळांची कमतरता यांमुळे देशात अवघे दीडशे माळढोक उरले असल्याचे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी’ (बीएनएचएस) या संस्थेच्या  अहवालातून उघड झाले आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे, यंदाच्या वर्षी झालेल्या पाहणीदरम्यान महाराष्ट्रात एकही माळढोक आढळलेला नाही.

‘बीएनएचएस’ने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालानुसार माळढोक नष्ट होण्यासाठी या पक्ष्यांच्या मूलस्थानाचा अभाव, प्रजननाच्या जागेची कमतरता आणि नागरिकांमध्ये या पक्ष्याविषयी असलेली अपुरी माहिती अशी मुख्यत्वे कारणे असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात २०१४ साली सहा ग्रेट इंडियन बस्टर्ड पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. २०१५ साली एक पक्षी आढळला. तसेच २०१६ मध्ये या पक्ष्याची एकही नोंद करण्यात आली नाही. मोकळ्या गवताळ जागेवर या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते. हे पक्षी वर्षभरात एक ते दोन अंडी जमिनीवरच घालतात. मात्र या पक्ष्यांच्या क्षेत्रात गुरे-बकऱ्या चरण्यासाठी सोडण्यात येत असल्याने अंडी नष्ट होऊन दिवसेंदिवस या पक्ष्याचे प्रमाण कमी होत चालले आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. भारतात या पक्ष्यांचा आकडाही कमालिचा रोडावत असून तो जेमतेम दीडशेच्या आसपास असल्याचे निरीक्षण बीएनएचएस या संस्थेने नोंदविले आहेत. विशेष म्हणजे, सरकारच्या कम्पॅनेशन ऑफ फॉरेस्ट स्टेशन फंड मॅनेजमेंट प्लॅनिंग ऑथोरिटीच्या (कॅम्पा)या योजनेच्या माध्यमातून या पक्ष्याच्या संवर्धनासाठी ३३ कोटी ८५ लाख  एवढी तरतूद करण्यात आली आहे. तरीही त्यांची संख्या रोडावू लागल्याने हा पक्षी एकदिवस नजरेआड होईल, अशी चिंता पक्षीप्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे.

पाणथळी अथवा तळय़ाकाठचा परिसर या पक्ष्यांसाठी प्रजननाचे स्थळ असते. अशा ठिकाणी नर पक्षी नृत्य करुन मादी पक्ष्याला प्रजननासाठी आमंत्रित करतो. वाढत्या शहरीकरणामुळे या ‘लेकिंग साईट्स’ नष्ट होत असल्याने या पक्ष्यांच्या प्रजननाचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा इशारा यापुर्वीच वन्यजीव छायाचित्रकारांनी दिला होता. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र येथे कॅम्पातर्फे कॅप्टिव्हिटीमध्ये ब्रिडींग करणे, पक्ष्याचे वास्तव्य असणाऱ्या जागेचे रक्षण करणे, अंडी  वाचवण्याचा प्रयत्न करणे अशा उपायांचा अवलंब केला जात आहे. मात्र या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेली मोहिम देखील अयशस्वी ठरत आहे.

माळढोकविषयी..

  • दिसायला अतिशय देखणे आणि रुबाबदार असलेले ग्रेट इंडियन बस्टर्ड भारतात पूर्वी मुबलक प्रमाणात होते. मोराऐवजी या पक्ष्याला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्याचे प्रयत्न सुरु होते.
  • ग्रेट इंडियन बस्टर्ड सोबत हौसारा बस्टर्ड, लेसर फ्लॉरिकॅन, बेंगल फ्लोकॅन अशा या पक्ष्याच्या प्रजाती आढळतात.
  • राजस्थानमधील जैसलमेर आणि बिकानेर, महाराष्ट्रातील नाणज, गुजरातमधील भुज, मध्यप्रदेशात करेरा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणी ग्रेट इंडियन बस्टर्डचे वास्तव्य आढळते.
  • यापैकी सध्या राजस्थानमध्ये केवळ तीसच्या आसपास या पक्ष्यांची संख्या आढळते. गुजरातमध्ये नलिया बस्टर्ड सेंच्युरी येथे सहा ते आठ पक्षी आढळतात.
  • मध्य प्रदेशमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांत हा पक्षी सापडलेला नाही असे पक्षीमित्रांकडून सांगण्यात येत आहे.

सोलापूरमध्ये या पक्ष्याच्या संवर्धनासाठी ‘गेट्र इंडियन बस्टर्ड सेंच्युरी’ जाहिर केली. मात्र या ठिकाणी बांधकाम करताना विविध पातळीवरील परवानग्या घेणे बंधनकारक असल्याने नागरिकांनी या पक्ष्यालाच विरोध केला. नागरिकांमध्ये या पक्ष्याविषयी असलेला माहितीचा अभाव या पक्ष्याच्या ऱ्हासाचे महत्त्वाचे कारण सांगता येईल. –  डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार, छायाचित्रकार

केंद्र व राज्य सरकारने माळढोकच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना या पक्ष्याविषयीची माहिती देऊन जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीतर्फे होणाऱ्या अभ्यासाची दखल घेऊन उपाययोजना सरकारने करणे आवश्यक आहे.  –  डॉ. असद रेहमानी, वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार (बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटी)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:06 am

Web Title: only 150 great indian bustards left
Next Stories
1 काम मंदावल्याने रुळांना गंज, लोखंडी सामानाची चोरी
2 पाणीपट्टी चुकवणाऱ्यांचे नळ बंद
3 नोटा बदलण्यासाठी रोजंदारांची नेमणूक
Just Now!
X