भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात करोना विषाणूचा प्रसार मोठा झपाटय़ाने असताना पालिकेकडून आतापर्यंत केवळ २९ हजार ८५८ नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या. त्यातही आता पालिकेने परिस्थिती नियंत्रणात येण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. यामुळे नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे चाचणी कमी होत असल्याचा आरोप होत आहे.

सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार मीरा भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या ९ हजार ७१४ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत ३१८ रुग्णांचा करोनामुळे  बळी गेला आहे. अशा परिस्थितीत रुग्ण चाचणी वाढविणे गरजेचे असताना चाचणी कमी होत असल्याचे आरोप होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेला राज्य शासनाकडून १ लाख अँटिजेन्ट किट उपलब्ध झाल्या होत्या. असे असतानाही चाचण्यांचे प्रमाण कमी का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

अँटिजेन्ट किटच्या साहाय्याने  मीरा-भाईंदर शहरातील रुग्णांच्या आणि रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबीयांची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे; पण त्यातही काही ठरावीक रुग्णांच्या चाचण्या केल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. आतापर्यंत केवळ ३० हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात आल्या आहेत.  त्यातही महापालिका वैद्यकीय उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी परिस्थिती नियंत्रणाच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. आजही शहरात दिवसाला सरासरी १३० ते १४० रुग्ण सापडत आहेत. त्यातही एकादोघांचा मृत्यू होत आहे.

रुग्ण चाचण्या कमी झाल्याचे आरोप

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता अधिकाधिक चाचण्या करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पालिकेला महिन्याभरापूर्वी अँटिजेन्ट किट उपलब्ध करण्यात आले आहे; परंतु तरीदेखील आतापर्यंत केवळ ३० हजार नागरिकांनीच करोना तपासणी झाली असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.