News Flash

बारवीतील पाणीसाठा केवळ ३३ टक्क्यांवर

बारवी धरण आणि आंद्र धरणामुळे बारमाही झालेली उल्हास नदी हे ठाणे आणि आसपासच्या शहरांचे प्रमुख जलस्रोत आहेत.

दौंडला पिण्यासाठी अर्धा टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी खडकवासला धरणातून सोडण्याची तयारी पालिकेतील गटनेत्यांनी दाखविली असतानाही या सर्वाना झुगारून लावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंडसह इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. (संग्रहित छायाचित्र)

बाष्पीभवनामुळे पाणी आणखी आटण्याची शक्यता; पाणीकपातीत वाढ होण्याची भीती
गतवर्षीच्या अवर्षण परिस्थितीमुळे भीषण पाणीटंचाईला तोंड देत असलेल्या ठाणेकरांवर आणखी संकट कोसळण्याची शक्यता आहे. ठाण्यासह जिल्ह्यातील सर्व शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये जेमतेम ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. हा पाणीसाठा कसाबसा १५ जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, एप्रिल आणि मे या महिन्यांत कडाक्याच्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी वेगाने घसरण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच अन्य शहरांच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बारवी धरण आणि आंद्र धरणामुळे बारमाही झालेली उल्हास नदी हे ठाणे आणि आसपासच्या शहरांचे प्रमुख जलस्रोत आहेत. या दोनच स्रोतांद्वारे ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे उल्हास नदीतील उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी यापूर्वीच कपात लागू करण्यात आली आहे. पाणीकपात ३५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचल्याने शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तसेच उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नदीतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागले आहे. त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खालावत आहे. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. असे असतानाच बारवी धरणामध्ये ३३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी साधारण या काळात धरणामध्ये ३७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता, त्या तुलनेत यंदा चार टक्के साठा कमी आहे. त्याचबरोबर एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत उन्हाचा पारा जास्त असतो. त्यामुळे या दोन महिन्यात धरणातील पाणी पातळी खालावण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास धरणातील उपलब्ध पाणीसाठय़ाचे जुलै महिन्यापर्यंत नियोजन करण्यासाठी पाणीकपातीत आणखी वाढ होऊ शकते. या कपातीमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईची समस्या अधिक भेडसावण्याची शक्यता आहे.

‘सध्याचे नियोजन कायम’
बारवी धरणामध्ये ३३ टक्के पाणी साठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेलइतका आहे. त्याचप्रमाणे शहरांमधील पाणीकपातीचे नियोजन आखले आहे. तसेच उन्हाच्या पाऱ्यामुळे धरणातील पाण्याची पातळी खालावली तर त्यानुसार पाणी कपातीचे पुढील नियोजन आखण्यात येईल. सध्या मात्र कपातीचे आहे तेच नियोजन लागू राहील, अशी माहिती कळवा लघु पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अधीक्षक अभियंता एफ.पी. सोनावणे यांनी दिली.

टोल फ्री क्रमांक
एकीकडे भीषण पाणीटंचाई असताना दुसरीकडे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन टँकरमाफिया सक्रीय झाले आहेत. ते चढय़ा दराने पाण्याची विक्री करू लागले आहेत. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी घेतली आहे. नागरिकांना अशा टँकरमाफियांविषयीच्या थेट तक्रारी करता याव्यात म्हणून प्रशासनाने १०७७ टोल फ्री क्रमांक जाहीर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 3:00 am

Web Title: only 33 percent of the water left in barvi dam
Next Stories
1 भिवंडीतील गावागावांतील रस्त्यांचा कायापालट
2 पाणीटंचाईमुळे दिव्यातील स्वागतयात्रा रद्द
3 कल्याण-डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांचे आक्रमण
Just Now!
X