पालकमंत्र्यांच्या उन्नत मार्गाला ‘एमएमआरडीए’चा ठेंगा
ठाणे-नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली या प्रवासाकरिता हमरस्ता मानल्या जाणाऱ्या शीळ फाटा ते कल्याण या चार पदरी रस्त्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून शीळ ते डोंबिवली असा उन्नत मार्ग उभारण्याच्या ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनसुब्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पाणी फेरले आहे. उन्नत मार्गाऐवजी शीळ फाटा ते काटई जंक्शन या चार किमीच्या मार्गावर सलग एकच उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.
शीळ फाटा मार्ग हा ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांतील वाहतुकींसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. उरण येथील जेएनपीटी येथून भिवंडीकडे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी देखील हाच रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. या पाश्र्वभूमीवर एमएमआरडीएने शीळ फाटा ते पलावा सिटीलगत असलेल्या कल्याण जंक्शन परिसरात दोन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वी आखण्यात आला होता. मात्र या दोन पुलांच्या दरम्यान जेमतेम ६० मीटरचे अंतर असल्याचा साक्षात्कार एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना झाल्यामुळे या मार्गावर सुमारे चार किमी अंतराचा एकच उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक विभागाने मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुंब्रा जंक्शन येथून सकाळच्या वेळेत प्रति तास सुमारे दहा हजार तर शीळ फाटा जंक्शन येथून १२ हजारांहून अधिक वाहनांची ये-जा असते. भविष्यात हा आकडा आणखी वाढेल. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या मार्गावर उड्डाणपुलांची आखणी केली आहे. त्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधीही राखीव ठेवला आहे. असे असले तरी या मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे महानगर विकास प्राधिकरणाने नियोजित उड्डाणपुलाच्या आखणीचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापे- शीळ फाटा- कल्याण जंक्शनवर यापुढे दोनऐवजी एकच सलग उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंब्रा जंक्शन येथील उड्डाणपूल यापुढे तीन मार्गिकांचा असणार आहे. त्यामुळे ९७ कोटी रुपये किमतीच्या या उड्डाणपुलाच्या कामाच्या खर्चाने थेट २८६ कोटी रुपयांपर्यंत उडी घेतली आहे. मात्र, भविष्याचा विचार करता हे नियोजन योग्य असल्याचा दावा एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.