25 April 2019

News Flash

तुंगारेश्वर अभयारण्यात केवळ एक बिबटय़ा

 २०१६मध्ये वनविभागाने ‘वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी’ या संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण केले.

(संग्रहित छायाचित्र)

वनविभागाच्या सर्वेक्षणातून माहिती

तुंगारेश्वर अभयारण्यात असलेल्या बिबटय़ांची संख्या कमी झाली आहे. २०१६मध्ये अभयारण्यात पाच बिबटे होते, आता मात्र केवळ एक बिबटय़ा शिल्लक असल्याची माहिती वनविभागाने दिली.

२००३मध्ये तुंगारेश्वर अभयारण्य घोषित करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा ते मांडवीपर्यंत तुंगारेश्वर अभायरण्याची हद्द आहे. ८ हजार ५७० हेक्टर या वनपरिक्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. त्यात पूर्वी मोठय़ा प्रमाणात विविध पशू आणि प्राण्यांचा वावर होता. त्यात बिबटय़ा, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्य प्राणी तर पोपट, मोर, बगला, घुबड, हळद्य, कोकिळा पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्य अशा २५० हून अधिक प्रजातीचे पक्षीही आहेत.

२०१६मध्ये वनविभागाने ‘वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी’ या संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण केले. त्या वेळी पाच बिबटे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आता केवळ एकच बिबटय़ा उरल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. अतिक्रमण आणि जंगलाला वारंवार लावण्यात येत असलेल्या आगी यांमुळे बिबटय़ांची संख्या कमी झाल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. आगीमुळे अनेक प्राणी बाहेर पडतात आणि अपघाताला बळी पडतात, अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. महामार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळी उभारली तर बिबटय़ांचे अशा अपघातांपासून सरंक्षण होऊ  शकेल.

वनविभागाची प्राणी व पशूगणना वर्षांतून एकदाच होत असते. ती गणना एप्रिल व मे दरम्यान केली जाते. वनविभागामार्फत एक दिवस ठरवून संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी गणना करण्यात येत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

वनविभागाच्या वतीने एकच दिवस ठरवून संपूर्ण राज्यात प्राणिगणना केली जात असते. वनविभागाने केलेल्या नोंदीनुसार अभयारण्यात आता एकच बिबटा उरलेला आहे. २०१९ मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात पुढील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

– एन. बी. मुठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुंगारेश्वर

First Published on December 6, 2018 2:04 am

Web Title: only one leopard in tungareshwar wildlife sanctuary