मीरा रोड ते वैतरणा स्थानकांचा भार एका पोलीस ठाण्यावर

वसई : पश्चिम रेल्वेवरील मीरा रोड ते वैतरणापर्यंतच्या एकाही रेल्वे स्थानकावर पोलीस चौकी नसल्याचे दिसून आले आहे. या मार्गावरील सातही रेल्वे स्थानकांचा भार वसई रेल्वे पोलीस ठाण्यावर असून कोणत्याही स्थानकावर गुन्हे घडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी वसईला जावे लागते. चौक्या नसल्याने पोलीस बंदोबस्त ठेवता येत नसून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणेही कठीण होऊ लागले आहे, असे मत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द मीरा रोड ते वैतरणा अशा स्थानकापर्यंत आहे. यामध्ये मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या स्थानकांचा समावेश आहे. मात्र या सर्व रेल्वे स्थानकांसाठी वसई येथे केवळ एकच रेल्वे पोलीस ठाणे आहे. विविध स्थानकांत घडणाऱ्या गुन्ह्य़ांची तक्रार करण्यासाठी प्रवाशांना वसईच्या रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागत आहे. प्रत्येक स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पोलीस चौक्या नसल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होऊ  लागली आहे. सध्याचे वसईचे रेल्वे पोलीस ठाणे रेल्वे कॉलनीच्या इमारतीमध्ये सुरू आहे. मात्र हे कार्यालय वसई रेल्वे स्थानकापासून दूरच्या अंतरावर असल्याने येथे जाण्यासही नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात. यासाठी रेल्वे पोलीस ठाणे हे रेल्वे स्थानकाच्या बाजूला तयार करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या संख्येबरोबर रेल्वे स्थानकांत गुन्ह्य़ांची संख्याही वाढत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात सर्वाधिक गुन्ह्य़ांच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. वाढते गुन्हे आणि अपघातांचे वाढते प्रमाण यांमुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना चौकी असणे आवश्यक आहे. परंतु चौकी नसल्याने एखादी अपघाताची घटना घडल्यास त्याची तात्काळ नोंद होत नाही, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे पोलिसांना सुविधा नाही

वसईच्या रेल्वे पोलीस ठाण्यात १५० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु लोहमार्ग हे राज्य शासनाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही. रेल्वे अपघातामध्ये व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास सर्व सोपस्काराची कामे रेल्वे पोलिसांना करावी लागतात. परंतु ही सर्व कामे पार पडण्यासाठी स्थानकात पोलीस चौक्या नाहीत. ज्याप्रमाणे रेल्वे सुरक्षा दलाला चौक्या आणि सुविधा आहेत, तशाच चौक्या आणि सुविधा रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, असा आरोप रेल्वे पोलिसांनी केला आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार प्रत्येक स्थानकात जर पोलीस चौक्या आणि त्या त्या विभागानुसार पोलीस ठाणी जर तयार झाली तर प्रवाशांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळतील. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनाही काम करणे सोपे जाईल.

– भास्कर पवार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वसई रेल्वे