लाकूड वाहून नेणारा टेम्पो ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात

निखिल अहिरे
ठाणे : पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्र असलेल्या येऊरच्या जंगलातून तस्करांनी वृक्षतोड केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी येऊर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओंडके वाहून नेणारा टेम्पोचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. वृक्षतोडीसाठी आणलेला टेम्पो हा येऊरमधील एका पाडय़ाजवळ आढळून आला. येऊरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वन विभागाचा बंदोबस्त असतो. असे असताना या टेम्पोला येऊरमध्ये प्रवेश कसा मिळाला, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलात अनेक दुर्मीळ वनस्पती, वृक्ष, पक्षी आणि प्राणी आढळून येतात. त्यामुळे येऊरचे जंगल हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जंगलातील पाडय़ांपुढे पर्यटनाला बंदी आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक जण या घनदाट जंगलात प्रवेश मिळवतात. गेल्या आठवडय़ात जंगलामध्ये वृक्षतोड झाल्याची गंभीर बाब समोर आली. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता येऊर येथील काही स्थानिक ग्रामस्थांना एक मोठा टेम्पो पाडय़ाजवळील रस्त्यावरून जाताना दिसला. ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी टेम्पोचा पाठलाग करत तो अडवला आणि त्याची पाहणी केली असता त्यात लाकडांचे मोठे ओंडके दिसून आले. त्यानुसार ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालकाला आणि त्याच्यासमवेत असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
damage forests
उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी!
combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली

वन विभागाने हस्तगत केलेल्या लाकडाचे ओंडके हे गुलमोहर आणि अ‍ॅकेशिया या वृक्षांचे असल्याचे समोर आले आहे. ही वृक्षतोड नवीन नसून काही दिवसांपूर्वी हे ओंडके तोडण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणाहून वृक्षतोड झाली आहे ती जागा राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत येत नसून ठाणे महसूल विभागाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून याचा सखोल तपास सुरू असल्याचे येऊर वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. असे असले तरी येऊरसारख्या संवेदनशील भागात वन विभागाच्या डोळय़ांसमोर असे प्रकार कसे होऊ शकतात, असा संतप्त सवाल तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

बेकायदा होणाऱ्या वृक्षतोडीमुळे येऊरच्या वनसंपत्तीला मोठे नुकसान पोहोचत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कोणालाही पाठीशी न घालता संबंधित प्रशासनातर्फे दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

– किशोर म्हात्रे, रहिवासी, येऊर