पाच दिवसांनंतर मृतदेहाचा छाडा

विरार : वसई-विरार परिसरात उघडय़ा गटारात पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. अर्नाळा येथील उघडय़ा गटारात एका आठ वर्षीय बालकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरातील बोळिंज येथे एका वयोवृद्ध व्यक्तीचा उघडय़ा गटारात मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होती.

विरार पश्चिमेला बोळिंज परिसरातील यशवंत विहार या इमारतीत राहणारे कृष्णा कुपेकर (८९) हे शनिवारी आपल्या नातवाला शिकवणीला सोडायला गेले, ते परत आलेच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा परिसरातील सर्व ठिकाणी शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. म्हणून अर्नाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.  तब्बल पाच दिवसांनी गुरुवारी त्यांचा मृतदेह एका गटाराच्या उघडय़ा चेंबरमध्ये आढळून आला. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. गटाराला झाकण नसल्याने उघडय़ा गटारात पडून त्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

गटार बंदिस्त नाही

विरार पश्चिमेला म्हाडा वसाहतीत सहयोग रुग्णालयामागे असलेल्या रस्त्यालगत एका विकासकाने इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे. या बांधकाशेजारी अगदी रस्त्यालगत या गटाराचे बांधकाम करण्यात आले आहे. गटार बांधून तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी हे गटार बंदिस्त केले नाही. याच रस्त्यावरून सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी अनेक रहिवासी फेरफटका मारण्यासाठी येतात. हे उघडे गटार अगदी रस्त्याला लागूनच आहे. यामुळे येथील रहिवाशांना या उघडय़ा गटाराचा मोठा धोका संभवतो. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून उघडय़ा  गटारामुळे अपघात वाढण्याची भीती आहे. हे गटार लवकरात लवकर बंदिस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.