सांस्कृतिक, सुशिक्षित, मध्यमवर्गीयांच्या डोंबिवलीत गेल्या महिनाभरात रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून दोघांची हत्या झाली. एकाने रात्रीच्या वेळेस भर रस्त्यात नगरसेवकाच्या भावाच्या डोक्याला पिस्तूल लावले. आडिवली गावात लग्नामध्ये गोळीबार करण्यात आला. ठाकुर्लीतील गोळीबारात व्यावसायिक वादातून तरुणावर २४ गोळय़ा झाडण्यात आल्या. आयरे गावात जमिनीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. या घटना कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेतच; पण त्याबरोबरच पिस्तूल, रिव्हॉल्वरसारखी शस्त्रे खुलेआम आणि सहज कशी उपलब्ध होतात, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

डोंबिवली परिसरातील विविध व्यक्तींकडे पोलीस परवानाधारी ६६८ रिव्हॉल्व्हर, पिस्तूल आणि बंदुकी आहेत. १९८० च्या दशकात डोंबिवली, कल्याण परिसरात काही नामचीन गुंड-टोळ्यांचा वावर होता. अंतर्गत स्पर्धकांचा काटा काढण्याबरोबर या मंडळींना ‘खेळण्या’साठी पैसे लागायचे. ते बिल्डर, डॉक्टर, धनवान यांच्याकडून खंडणीने वसूल केले जायचे. ही या टोळीबाजांची कार्यपद्धती होती. या टोळीबाजांपासून स्वसंरक्षणासाठी ३० वर्षांपूर्वी डोंबिवलीतील अनेक धनवानांनी पोलीस परवाना मिळवून शस्त्रे घेतली.

गुंड-टोळ्यांचा आपापसातील काटाकाटी आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकून नायनाट झाला. मात्र या टोळ्यांच्या भीतीने अनेक घरांच्यामध्ये असलेली परवानाधारी रिव्हॉल्व्हर, पिस्तूल आणि बंदुका ही शस्त्रे आहे तशीच आहेत. याउलट ३० वर्षांपूर्वी जे बिल्डर, डॉक्टर, धनवान व्यावसायिक होते. ते आता आपल्या व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. काहींना शस्त्रे चालविणे सोडाच; शस्त्र हातात धरणेही शक्य नाही. त्यांना संरक्षणाची काही आवश्यकता नाही. फक्त जुने संरक्षण आहे ते पुढे सुरू आहे एवढेच. आता या मंडळींच्या मुलांना कपाटातील ही शस्त्रे दिसू लागली आहेत. बाप कमाईवर जगणारी ही कर्तृत्वशून्य पिढी ही शस्त्रे हाताळू लागली आहे. डोंबिवलीत वडिलांचा बांधकाम धंदा बंद पडून अनेक वर्षे झाली तरी त्या नावावर अनेक मंडळी घरात शस्त्र बाळगून आहेत. त्या जुन्या बांधकाम धंद्याचा वारसा पुढे करून पोलिसांकडून परवानाधारी शस्त्रे पदरात पाडून घेत आहेत. बेकायदा चाळी बांधायच्या. त्या नावाखाली ‘बिल्डर’ म्हणून मिरवायचे, असे नवीन सूत्र विकसित झाले आहे. या मंडळींना सरसकट शस्त्रांचे परवाने कसे दिले जातात हाही एक प्रश्नच आहे.

शस्त्रे मिळविताना ‘पॅकेज सिस्टम’ अस्तित्वात आहे. स्थानिक पोलीस ठाणे ते आयुक्तालयापर्यंतच्या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी एक दलाल ‘गाठोडे’ घेऊन फिरतो आणि त्या मिसरूड न फुटलेल्या पोराला शस्त्र परवाना मिळून देतो, अशी वदंता आहे. गेल्या तीन वर्षांतील शस्त्र परवाने अशाच पॅकेज पद्धतीने वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. हा जो शस्त्र परवाना वाटप करण्याचा गोरखधंदा पोलिसांकडून सुरू आहे, तो या शहराला पुन्हा टोळीबाज, संघटित गुन्हेगारीकडे नेण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. सदैव पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे गृहखाते आहे. पण शस्त्रपरवान्यांच्या या खिरापतीवर बंधने आणण्याचे त्यांना अद्याप सुचलेले नाही, हे विशेष!

 लोकप्रतिनिधींचा बडेजाव

डोंबिवली, कल्याणमधील ९० टक्के शस्त्र परवाने बांधकाम व्यावसायिकांकडे आहेत. यातील अनेक जण स्वत:च बेकायदा व्यवसायात आहेत. अनेक जण सरकारी नियम धाब्यावर बसवून अतिक्रमणे करून बेकायदा चाळी उभारत आहेत. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे अभय आहे.

शहरातील अनेक लोकप्रतिनिधी गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत. तरी त्यांना स्वत:चे परवानाधारी शस्त्र, सोबत आडदांड उत्तर प्रदेश काठीचे बंदुकधारी संरक्षक आहेत. रस्त्याला समोरच्याने वाहन बाजूला घेऊन साहेबाना जाण्यास मुभा नाही दिली तर त्याला कमरेचा कट्टा दाखविण्यास ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. उत्तर प्रदेशचे जे बंदूकधारी अनेक लोकप्रतिनिधींच्या सोबतीला असतात, त्यांच्या बंदुका, त्यांच्या गोळ्यांच्या साठय़ाची नोंदणी, तपासणी पोलिसांकडून केली जाते का? अनेक लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने उत्तर प्रदेशमधील आहेत.

त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे आहे. गुन्हेगार लोकप्रतिनिधींना संरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी पैसे भरून पोलीस संरक्षण घ्यावे आणि त्यांची शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावीत. गुन्हेगार, टोळीबाजांचे कावे कमी करायचे असतील तर गुन्हेगार लोकप्रतिनिधींच्या शस्त्र परवान्यांवर प्रथम टाच आणणे गरजेचे आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आवारात तीन महिन्यापूर्वी दोन प्रतिस्पर्धी नगरसेवकांमध्ये झालेले तुंबळ शीतयुद्ध आणि नगरसेवकांच्या गाडय़ांमध्ये सापडलेल्या शस्त्रसामुग्रीचे उदाहरण या बाबतीत बोलके ठरावे.

रायफलींचा उपयोग काय?

डोंबिवलीतील काही लक्ष्मीपुत्रांकडे २२६ परवानाधारी बंदुका आहेत. या परवानाधाऱ्यांनी कधी वरळीच्या शुटिंग रेंजमध्ये जाऊन बंदुकीचा वापर केलाय का? कधी कोणत्या नेमबाजीच्या क्रीडाप्रकारात सहभाग घेतलाय का? याचा शोध कधी पोलिसांनी घेतला आहे? अनेक परवानाधारी फार्म हाऊसवर जाऊन गोळ्या उडवितात. हळदी समारंभात हवेत गोळ्या उडवितात, हे कायद्याला धरून आहे का? डोंबिवलीतील अनेक परवानाधाऱ्यांच्या कागदपत्रांवर २०० ते ६०० जिवंत काडतुसांची नोंद आहे. ही काडतुसे खरेच त्यांच्या ताब्यात आहेत? इतक्या वर्षांत त्यांच्याकडील पुंगळ्या संपल्या असतील तर त्याचा त्यांनी वापर कोठे केला? हे विचारण्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे डोंबिवलीत पुन्हा संघटीत गुन्हेगारी डोके वर काढण्याची शक्यता आहे.

डोंबिवलीतील परवानाधारी शस्त्रांची माहिती

* रामनगर पोलीस स्थानक

रिव्हॉल्व्हर ७२, पिस्तूल ८६, बंदूक ३०.

 

* विष्णुनगर पोलीस स्थानक

रिव्हॉल्व्हर १०२, पिस्तूल ४२, बंदूक ९७.

* मानपाडा पोलीस स्थानक

रिव्हॉल्व्हर ७२, पिस्तूल २१, बंदूक ७६.

*  टिळकनगर पोलीस

रिव्हॉल्व्हर ३५, पिस्तूल १२, बंदूक २३.