25 May 2020

News Flash

उन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर!

लोकसत्ता सहप्रायोजक ‘माइंड फेस्ट’मध्ये मनोविकारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांचे मत

‘माइंड फेस्ट’ला शनिवारी ठाणे आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली.

संताप, भीती, चिंता, खंत आणि उन्माद या आदिम भावनांमुळे माणसाला संकुचितपणा येतो. त्यामुळे या आदिम भावनांतून बाहेर पडून प्रगत भावनांना हाताशी धरून उन्नत भावनांना आपलेसे केल्यानंतर सुंदर आयुष्य जगता येते, असा सल्ला सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आयपीएच प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’ महोत्सवात उपस्थितांना दिला. वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेतील श्लोकांसह ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संदर्भ देत त्यांनी मार्गदर्शन केले.

लोकसत्ता सहप्रायोजक असलेल्या ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाला शुक्रवारी मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. ठाण्यातील समर्थ सेवक मंडळाच्या मैदानात सुरू असलेल्या या तीनदिवसीय महोत्सवाला ठाणे आणि मुंबई परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

माणसाचे आयुष्य विचार, भावना आणि वर्तन यांवरच अवलंबून असते. मात्र या तीनही गोष्टी एकमेकांभोवतीच फिरत असतात. या तीन गोष्टींचा विस्तार व्हायला हवा. मानवाला प्रवृत्ती आणि निवृत्तीची सांगड घालता आली पाहिजे जेणेकरून त्याच्या भावनिक परिघाचा विस्तार होतो, असे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या संकल्पनेवर आधारित ‘माइंड फेस्ट’ महोत्सव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असे तीन दिवस रंगत असून डॉ. आनंद नाडकर्णी हे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि प्रेक्षकवर्ग मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होता.

व्यक्तीवर कर्मकांड, प्रतिगामित्व आणि बंडखोरी यांचा प्रभाव

असतो, मात्र व्यक्तीने समतोल, संतुलन, उत्पत्ती, स्थिती, लय, ताल या जीवन मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करायला हवा. भावनांच्या आणि विचारांच्या उत्क्रांतीत मेंदूच्या विकासाची दशा कण्याकडून कवटीकडे गेलेली आहे. भाषा, अंक, संगीत यांच्या मूलभूत तत्त्वज्ञान आणि विज्ञानावर व्यक्तीची वाढ झाली. त्यानंतर आदिमानवासमोर विविध जीवशास्त्रीय आव्हाने आली. लढा, पळा आणि स्तब्ध राहा या तीन आव्हानात्मक प्रेरणांमधून भावना निर्माण झाल्याची माहिती डॉ. नाडकर्णी यांनी उपस्थितांना दिली.

प्रत्येक कृती हीच पूजा

उन्नत भावना म्हणजेच माणुसकी असे सांगत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उन्नत भावनांचे विश्लेषण केले. भावनांच्या एकाग्रतेसाठी मनशुद्धी, शुद्धबुद्धी आणि सुनिश्चयता असायला हवी. त्यासाठी पूजा करत असल्यास पूजेच्या क्रियेला जागृत राहायला हवे. तसेच प्रत्येक कृती हीच पूजा असल्याचे सांगत त्यांनी त्याग आणि दानामधील फरकाची माहिती दिली. साक्षीभाव निर्माण करून स्वतच्या विचारांकडे केवळ पाहात राहा, स्वतच्या जीवनाचे प्रवासी व्हा, उन्नत भावनांची उजळणी करा, संस्कार, शिक्षण यादेखील उन्नत भावना असून माणुसकी जपा असा सल्ला डॉ. आनंद नाडकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2019 1:18 am

Web Title: opinion of psychiatrist anand nadkarni in lokasatta co sponsor mind fest abn 97
Next Stories
1 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का
2 गुडवीन ज्वेलर्सकडून फसवणूक; दोन जण अटकेत
3 लैंगिक अत्याचारप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X