महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या तक्रारी

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असणाऱ्या ठाणे शहरात राजरोसपणे अफू, गांजा यांसारख्या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचा खळबळजनक दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही महापौरांच्या दाव्याला पाठिंबा दिला. तर ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील कोठारी कंपाऊंड परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये सुरू असलेल्या लाऊंज बार, हुक्का पार्लर तसेच बडय़ा हॉटेलांतून अमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. त्यानंतर येत्या २० सप्टेंबपर्यंत या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

ग्लॅडी अल्वारिस मार्गालगत असलेल्या कोठारी कंपाऊंडची जागा गोदामांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी मनमानी पद्धतीने बांधकाम केले जात असून अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्याशिवाय येथे पब, हुक्का पार्लर, हॉटलांचे व्यवसाय सुरू आहेत, असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील अवैध धंदे सुरू असणाऱ्या बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई केली होती. लेडीज बारविरोधात आयुक्तांकडून करण्यात आलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना दुसरीकडे शहरात मोक्याच्या ठिकाणी नगररचना विभागाचे नियम धाब्यावर बसवून उभ्या रहात असलेल्या या बेकायदा ‘पब हब’कडे कानाडोळा का केला जात आहे, असा प्रश्न मुल्ला यांनी या वेळी उपस्थित केला.

कोठारी कंपाऊंडमधील अवैध बांधकामांचा मुद्दा चर्चेत असताना शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक आणि ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी शहरात हुक्का पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे अमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचा आरोप केला. सिद्धांचल, लोकपुरम, वसंत विहार, पवारनगर या पट्टय़ात बेकायदा पान टपऱ्यांवरून अमली पदार्थ विक्री केले जात असल्याचे परिषा सरनाईक यांनी या वेळी सांगितले. खारेगाव ते शीळ या पट्टय़ात तब्बल २१ बेकायदा हुक्का पार्लर सुरू असून त्यावर कारवाई करूनही काही होत नाही, असा मुद्दा राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी उपस्थित केला.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या या मुद्दय़ांबाबत महापौरांनीही चिंता व्यक्त केली. आधुनिकतेच्या नावाखाली ठाण्यात बोकाळत चाललेले हे अमली पदार्थ विक्रीचे अड्डे आत्ताच उद्ध्वस्त करायला हवेत, असे त्या म्हणाल्या. काही पानटपऱ्यांवर ‘पोपट पान’ या नावाने मादक पानाची विक्री सुरू असून याबाबत ठाण्याचे पोलीस उपायुक्त स्वामी यांची भेट घेऊन आपण तक्रारी नोंदवली आहे, असे महापौर म्हणाल्या.

या वेळी नगरसेवकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी रस्ता रुंदीकरणात विस्थापित झालेल्या अस्थापनांनी कोठारी कंपाऊंड परिसरात बांधकामे केली आहेत, असे स्पष्ट केले. सद्य:स्थितीत या ठिकाणी २६ ते २८ व्यावसायिकांनी बांधकामे केली असून कार्पेट एरियापेक्षा अधिक बांधकाम केले असेल तर त्यांना नोटिसा देऊन ते काढले जाईल, असे चव्हाण या वेळी म्हणाले. चव्हाण यांच्या उत्तरावर संतापलेल्या सदस्यांनी या वेळी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. कोठारी कंपाऊंड येथील ज्या बांधकामधारकांकडे अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नाही त्यांना परवाने देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना महापालिकेने अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत. यासंबंधी महापालिकेने या दोन्ही प्राधिकरणांना पाठवलेले पत्र सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभागृहात वाचून दाखविले. नजीब मुल्ला यांनी ही जागा गोदामांसाठी आरक्षित असताना झालेला वापर बदल स्पष्ट दिसत असतानाही नोटिसांची प्रक्रिया राबविण्याची गरजच काय, असा सवाल केला. महापौर शिंदे यांनीही गरिबांच्या घरावर कारवाई करताना प्रशासन कोणती नोटीस बजाविते, असा सवाल करीत २० सप्टेंबपर्यंत लाऊंज बार तसेच हुक्का पार्लर जमीनदोस्त करण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.