स्थानिक संस्था कर आणि अन्य व्यापारी करांचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना कचरा सेवा कराच्या रूपाने नवा कर लादण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. हा कर छोटे व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी अधिकचा बोजा ठरत असून त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका ठाणे व्यापार उद्योग महासंघाने सोमवारी घेतली.
 महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश सावला यांनी महापालिकेच्या नव्या कराविषयीची महासंघाची भूमिका स्पष्ट केली. व्यापारी एलबीटीचा भरणा करत आहेत. याशिवाय मालमत्ता कराच्या माध्यमातून साफसफाई कराचा भरणा होतो आहे. असे असताना नव्या कचरा कराचे प्रयोजन काय, असा सवाल मुकेश सावला यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना स्पष्ट केले.
महसूल वाढीसाठी ठाणे महापालिकेने मॉल आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी कचरा कर लागू करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेसाठी घेण्यात आला आहे. यावर लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहरातील हॉटेल, मॉल, सिनेमागृहांना कचरा कर देणे भाग होणार आहे. छोटय़ा दुकानांसाठी ५०० पासून सुरू होणारा हा कर मॉलसाठी ४५ हजार रुपये प्रतिमहा इतक्या स्वरूपाचा आहे. मॉल आणि पंचतारांकित हॉटेल्सला याचा अधिकचा बोजा वाटला नाही तरी छोटय़ा उद्योगांना त्यामुळे फटका बसण्याची शक्यता महासंघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने कर वसुलीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून असा कर लागू करायचा असल्यास त्याची स्पष्ट नियमावली असणे गरजेचे आहे. अन्यथा हा कर भ्रष्टाचारासाठी निमंत्रण देणाराही ठरू शकतो, असा सूरही व्यक्त केला जात आहे.