सत्ताधारी पक्ष एकमेकांना भिडले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यामुळे गेलेले जीव यावरून प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी सत्ताधारी शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

‘मनसे’ने मोर्चा काढून खड्डय़ांवरून अगोदरच राजकारण तापवले होते. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप, मनसे एका बाजूला तर शिवसेनेचे नगरसेवक प्रतिवाद करण्यासाठी दुसऱ्या बाजूला असा आखाडा सभेत रंगला. अखेर खड्डय़ांच्या विषयावर सामोपचाराने चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालून सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या दोन महिन्यानंतर प्रथमच होत असलेली सर्वसाधारण सभा तहकूब केली.

गेल्या आठवडाभरात शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ात पडून पाच जणांचा जीव गेला आहे. यामध्ये बालक, तरुणांचा समावेश आहे. काही जणांच्या घरातील कमावती व्यक्ती मरण पावली आहे. त्या विषयी संवेदनशीलता व्यक्त करीत महासभा सामोपचाराने चालविण्याऐवजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजकारणाचे डाव मांडत महासभा बंद पाडली.   रस्ते बांधणी, खड्डे या विषयावर सखोल चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही. शिवसेना समर्थक नगरसेवक कासिफ तानकी हे अंगाला चिखल लावून सभागृहात आले होते. पालिकेने भरलेले खड्डे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. त्या खड्डय़ांमध्ये पडून आपला हा अवतार झाला, असे तानकी यांनी सभागृहात सांगून प्रशासनाला धारेवर धरले आणि सत्ताधारी शिवसेनेलाच एक प्रकारे घरचा आहेर दिला. खड्डय़ांना जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी जोरदार मागणी सभागृहात तानकी करीत होते.

त्याचवेळी सत्ताधारी पक्षातील एक घटक असलेल्या भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांची खड्डय़ांच्या विषयावरील लक्षवेधी महापौर यांनी पटलावर घेतली नाही त्याचा निषेध करत सभागृहातील मोकळ्या जागेत बैठक मारली. त्यांच्या सोबत पक्षातील अन्य सदस्या सहभागी झाल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारू असे त्यांचे म्हणणे होते. पण ते फेटाळण्यात आले. उपमहापौरांनी सभासंकेत मोडल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. स्थायी समिती सभापती परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असे आरोप करीत नगरसेवक मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे यांनी सभागृह दणाणून सोडले.

हा गदारोळ सुरू असताना मनसेचे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी महापौर विनिता राणे यांच्यासमोरील राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेला. सेनेच्या नगरसेवकांनी तो हिसकावून पुन्हा सभागृहात आणला. खड्डय़ांच्या विषयावरून सभागृहात अभूतपूर्व गदारोळ सुरू होता. खड्डय़ांच्या विषयावर आपण सामोपचाराने चर्चा करू असे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत खड्डय़ांवरून काढलेल्या मोर्चाचे श्रेय मनसेला घेऊ द्यायचे नाही अशी व्यूहरचना शिवसेनेने आखली होती. महापौर विनिता राणे यांची पहिलीच सभा असल्याने या  गोंधळामुळे त्या ही बावरल्या. अखेर परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता नसल्याने सेनेच्या ज्येष्ठ सदस्यांनी महापौरांना एक चिठ्ठी लिहून पाठविली आणि तात्काळ वंदे मातरमला सुरुवात करून सभा तहकूब करण्यात आली.

या सगळ्या गदारोळात खड्डय़ांवरून अधिकाऱ्यांना खिंडीत पकडण्याची चांगली संधी नगरसेवकांनी सोडली. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कायम करण्यासाठी सभागृहात मंजुरीला आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला तर घरत यांना पुन्हा सेवेत घेणे लांबले असते. त्यामुळेच काही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातल्याची चर्चा आता महापालिकेत सुरू झाली आहे.