News Flash

टाळेबंदीची मुदत वाढविण्यास विरोध

ठाण्यात भाजपकडून सेनेची कोंडी

संग्रहित छायाचित्र

महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून लागू असलेल्या टाळेबंदीविरोधात व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने टाळेबंदीची मुदत वाढविण्यास विरोध करत सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे टाळेबंदीबाबत आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने २ ते १२ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात टाळेबंदी लागू केली होती. त्यानंतर प्रशासनाने टाळेबंदीची मुदत पुन्हा १९ जुलैपर्यंत वाढविली. या टाळेबंदीमुळे गेल्या १५ दिवसांपासून शहरातील दुकाने आणि उद्योग बंद असून यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने टाळेबंदी मागे घेण्याची मागणी व्यापारी आणि उद्योजक करीत आहेत. त्याचबरोबर निर्बंधामुळे नागरिकांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असून तेही टाळेबंदीविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.  टाळेबंदीची मुदत संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असून त्यानंतर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याबाबत कुतूहल आहे. असे असताना व्यापारी, नागरिक आणि उद्योजकांकडून टाळेबंदीस होत असलेल्या विरोधाचा मुद्दा घेऊन भाजपनेही टाळेबंदीची मुदत वाढविण्यास विरोध केला आहे. यासंदर्भात भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली.

जुन्या वाचनालयाला फटका

टाळेबंदीचा फटका डोंबिवलीतील ३४ वर्षे जुन्या ‘पै फ्रेंड्स अ‍ॅण्ड लायब्ररी’ला बसला आहे. टाळेबंदीमुळे जागेचे भाडे भरण्यास पैसे नसल्याने या वाचनालयाची एक शाखा बंद करण्यात येणार आहे. हे वाचनालय गेली ३४ वर्षे वाचनाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. या संस्थेचा डोंबिवली, मुंबई आणि पुणे भागांत मोठा वाचकवर्ग असून त्यांच्या डोंबिवलीत सहा शाखा आहेत. एक घरपोच सेवेचे कार्यालय आणि दोन अभ्यासिका आहेत. त्यापैकी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगरमधील केवळ एक जागा सोडली तर उर्वरित सर्व जागा भाडेतत्त्वावर आहेत. मात्र सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे वाचनालयाच्या जागेचे भाडे देणे शक्य होत नाही. त्याचबरोबर वीज देयके, कर्मचाऱ्यांचे वेतन, इंटरनेट खर्चही संस्थेला परवडत नाही. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे शाळेसमोरील शाखा ३१ जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. याबाबत वाचनालयाचे मालक पुंडलिक पै यांनी समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केला आहे.

आंदोलनाचा इशारा..

* मुंबईमधील काही भागांत सम-विषम नियमानुसार दुकाने आणि मर्यादित कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कार्यालये सुरू आहेत.

* त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये-जा सुरू आहे. मात्र टाळेबंदीमुळे उपजीविकेसाठी आवश्यक व्यवहार ठप्प झाल्याने ठाणेकरांमध्ये संताप आहे.

* तसेच टाळेबंदीच्या काळात करोनाला आळा बसलेला नाही, असा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला.

* टाळेबंदीची मुदत वाढविण्याची भूमिका घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 12:31 am

Web Title: opposition to extension of thane lockdown abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीमुळे आषाढ समाप्तीवर विरजण
2 मीरा रोड येथे १२ वर्षांच्या मुलीचा खेळताना गळफास लागल्याने मृत्यू
3 हृदयद्रावक! स्वतःच्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून विनाअनुदानित शिक्षकाची आत्महत्त्या
Just Now!
X