News Flash

वसईत फुलला परदेशी फुलांचा मळा!

शेतीसाठी सध्या पाटील हे गोमुत्र आणि शेणखत वापरत असल्याने फुलांना चांगल्या प्रकारे बहर येत आहे.

वसईत फुलला परदेशी फुलांचा मळा!

ऑर्चिड, हेलिकेनिया फुलांची यशस्वी लागवड, आगाशी येथील शेतकऱ्याची किमया
मोगरा, जाई, जुई आणि पिवळा चाफा या फुलांची शेती वसईला नवीन नाही. मात्र आता या देशी फुलांबरोबरच वसईत परदेशी फुलांचाही मळा फुलू लागला आहे. विरारजवळील आगाशी येथील शेतकरी बाबा पाटील यांनी आपल्या शेतात ऑर्चिड आणि हेलिकोनिया या फुलांची लागवड केली आहे. १६ एकरामध्ये ही फुले फुलू लागली असून पाटील यांनी परदेशी फुलांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.
वसईच्या पश्चिम पट्टय़ात बहुधा फूलशेती केली जाते. पिवळय़ा चाफ्याला बाजारा खूपच मागणी असल्याने येथील शेतकरी या फुलाच्या शेतीवर भर देतात. मात्र आगाशी येथील बाबा पाटील यांनी परदेशी फुलांची शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतात त्यांनी ऑर्चिड आणि हेलिकोनिया फुलांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ऑर्चिड या फुलांना अत्यंत शुद्ध पाणी लागत असल्याने त्यांनी आपल्या विहिरीवर खास आरओ प्लांट बसवून घेतला. ऑर्चिड या फुलासाठी जमीन लागत नसून ग्रीन नेस्टमध्ये नारळाच्या सालीमध्ये या फुलाचे बी लावून लागवड केली जाते.
या शेतीसाठी सध्या पाटील हे गोमुत्र आणि शेणखत वापरत असल्याने फुलांना चांगल्या प्रकारे बहर येत आहे. ऑर्चिड फुलांना बाजारात मोठी मागणी असून एका दांडीला १० ते २० रुपये मिळतात. सणासुदीच्या दिवशी याच दांडीला १०० ते १५० रुपये मिळतात. हेलिकोनियाला १५ ते २० रुपये आणि सणासुदीला १०० रुपये भाव मिळत आहे. याचबरोबर पाटील यांनी अ‍ॅन्थोरीयची लागवडही आपला ग्रीन हाऊसमध्ये केली आहे. हे करताना त्यांनी आधुनिकतेचा जोड दिल्याने कमी जागेत जास्त उत्पन्नाचा व्यवसाय मिळाला आहे. त्यांना सध्या एकरी १० लाख रुपये फुलांमधून मिळत आहेत. बाबा पाटील हे आगाशी येथील वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारप्राप्त विष्णू अण्णा पाटील यांचे सुपुत्र आहेत.

शेती व्यवसायामध्ये अनेक अडचणी असून त्यावर मात करून नवीन नव्या पिढीला एक वेगळे दालन आम्ही उघडे करून दिले आहे. सहकाराचा अवलंब करून शेती केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. ऑर्चिड आणि हेलिकोनियाच्या लागवडीचे तंत्रज्ञान ज्यांना हवे असेल, त्यांना आम्ही मदत करू.
– बाबा पाटील, शेतकरी, आगाशी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 5:11 am

Web Title: orchid and heliconia flower successful planted in vasai
Next Stories
1 मुंब्य्राचे गुलाब मार्केट जयस्वाल यांच्या रडारवर
2 दारू पिऊन ‘धूम’ ठोकण्यात तरुण पटाईत!
3 ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील कचरा अखेर हटला
Just Now!
X