ऑर्किड कॉम्प्लेक्स

एकमेकांना मदत, सण-समारंभ एकत्रित साजरे करणे आणि सामाजिक भान ठेवून सोसायटीमध्ये स्वच्छता राखणे आदी कर्तव्ये ‘ऑर्किड कॉम्प्लेक्स’मधील रहिवासी पार पाडतात. सोसायटीमधील सर्वच रहिवासी मिळून मिसळून राहत असल्याने तंटामुक्त सोसायटी म्हणून ‘ऑर्किड कॉम्प्लेक्स’चा लौकिक आहे.

राजानी रोड येथे वसई न्यायालयाच्या मागे २००६मध्ये उभारण्यात आलेल्या ऑर्किड कॉम्प्लेक्सला जवळजवळ १० वर्षे झाली आहेत. या सोसायटीचे वैशिष्टय़ म्हणजे या सोसायटीमध्ये क्लब हाऊस आणि तरण तलाव असून मुलांना खेळण्यासाठी खास मैदान आहे. सोसायटीच्या परिसरात मोकळी जागा दिसेल तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, छोटे वृक्ष आणि फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. हिरवाईची ओढ फक्त इथेच संपत नसून भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की, इमारतीच्या आवारात सभोवताली विविध वृक्ष बहरलेले दिसतात. यामुळे तापत्या दिवसांतही वातावरणात गारव्याचा अनुभव येतो. सोसायटीच्या छोटय़ा जागेतही वाहनांच्या वाहनतळाची व्यवस्था, मुलांना फुटबॉल, बॅडमिंटन कोर्ट, थ्रो बॉल, क्रिकेट खेळण्यासाठी वेगळी जागा आहे. या संकुलात अनेक ज्येष्ठ नागरिक, पुरुष मंडळी यांच्यासाठी खास आसनव्यवस्था आवारात करून दिली असून सायंकाळच्या वेळी सर्व येथे बसून निसर्गाच्या सान्निध्यात आपला वेळ घालवतात, तसेच त्या ठिकाणी अनेक गप्पागोष्टीही रंगतात. ज्येष्ठ नागरिक दिनदेखील प्रामुख्याने येथे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सहलीचे आयोजनही करण्यात येते.

या सोसायटीचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे वसईतील सर्वात स्वच्छ आणि सुंदर सोसायटी म्हणून ओळख बनवली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत संकुलातील सर्वच काटेकोर असून ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवतात. एवढेच नव्हे तर संकुलातील सर्व मिळून येथे स्वच्छता अभियानदेखील  राबवतात. संकुलाच्या याच गोष्टीची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सहकारी गृहसंस्था स्पर्धा २०१६/१७ चे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल

इमारतीत एकत्रितरीत्या सण साजरे केले जातात. दिवाळी, ख्रिसमस, गुढीपाडवा, दहीहंडी या सणांना सर्व जण एकत्र येतात. तर येथे माघी गणपती साजरा केला जातो. या वेळी रहिवाशांकडून सामाजिक बांधिलकी जपली जाते. या सणांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळांचे आयोजन केले जाते आणि वर्षांतून एकदा ‘फन फेअर’ कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर वसईतील विजयोत्सव, किल्ल्यातील सण वा इतर वेळीही स्नेहभोजनासाठी इमारतीतील रहिवासी बाहेर जातात. इतकेच नव्हे तर कधी कधी बाहेर चुलीवर स्वत: जेवण बनवून त्याचा आस्वाद घेतात. प्रजासत्ताकदिनी सत्य नारायणाची पूजा घातली जाते. सणसमारंभात पर्यावरणविषयक जागृती करण्यात येते. जलबचतीचे धडे दिले जातात. याशिवाय वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात येते.

शेजारधर्माची परंपरा

या सोसायटीत कधी भांडण तंटा होत नसून शांती नांदेल, अशी खबरदारी येथील प्रत्येक रहिवासी घेतो. तर आजच्या ‘आधुनिक’ जगात शेजारधर्म पाळणारी परंपरा या सोसायटीने तयार केली. या सोसायटीमध्ये १२८ फ्लॅट्स असून मुख्यत: कॅथलिक आणि हिंदू समाज या कुटुंबाची संख्या जास्त आहे. येथे भिन्नधर्मीय कुटुंबे तरीही त्यांच्या बोलण्या चालण्यात एक सहजपणा दिसून येतो. प्रत्येकासाठी स्वतंत्र वाहनतळाची सोय आहे. इमारतीत पर्जन्यजल संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रकल्प गेले ३ वर्षांपासून राबविला गेल्याने येथे पाण्याची कमतरता वर्षभर जाणवत नाही. तर या सोसायटीमध्ये चारही इमारतींमध्ये २० सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे बसवण्यात आले आहेत.