हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी

ठाणे:  मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरांत ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्याने ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे इत्यादी घटना घडू शकतात, याबाबत करावयाच्या उपाययोजनांकरिता त्यांनी आढावा बैठक घेतली.

शहरात ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मंगळवारी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या काळात प्रभाग समिती स्तरावरील अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले आहे. शहरात रस्त्यावर झाडे पडल्यास ती तात्काळ हटविण्यासाठी यंत्र आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देतानाच त्यांनी अतिवृष्टीमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास, भूस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे त्या त्या प्रभाग समितीमधील महापालिकेच्या शाळामध्ये तात्पुरती निवारा केंद्रे निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी तातडीने स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके तयार ठेवावीत तसेच राष्ट्रीय आपत्ती बचाव दल आणि लष्कराच्या पथकाशी समन्वय साधावा असे सांगितले. तौक्ते चक्रीवादळात शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे मोठे नुकसान आणि अपघात होण्याची भीती होती. अतिवृष्टीच्या काळात याच होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग्ज सुस्थितीत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्या आहेत. गरज पडल्यास धोकादायक स्थितीतील जाहिरात फलक त्वरित हटविण्याचा निर्णय घेण्याबाबतही सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना कळवण्यात आले आहे.