तत्काळ हटवण्याचे ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश; दरमहा पाच हजार दंड आकारण्याच्या सूचना

ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर विनापरवाना उभारण्यात आलेले ‘मोसमी छत’ (वेदरशेड) ताबडतोब काढा, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. ज्या ठिकाणी मोसमी छत हटवले जाणार नाहीत, तेथे दरमहा पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावेत. तसेच मोसमी छतावर कारवाईसाठी महापालिकेला येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, अशा सूचनाही जयस्वाल यांनी दिल्या आहेत.

जुन्या इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचून घरांमध्ये गळती सुरू होते. हे टाळण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था इमारतीच्या गच्चीवर मोसमी छत उभारतात. हे छत उभारताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, याकडे कानाडोळा करण्यात येतो. याखेरीज अनेक दुकानांच्या दर्शनी भागातही अशा प्रकारचे छत उभारून त्याचा वापर व्यवसायासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी केला जातो. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेले मोसमी छत ताबडतोब हटवण्याच्या सूचना त्यांनी नागरिकांना केल्या आहेत. या सूचनेनंतरही छत न हटवल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल व त्यासाठीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मोसमी छत हटवण्यापूर्वी संबंधितांकडून मूळ रक्कम पाच हजार आणि दंडाची रक्कम रुपये पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेशही त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहे.

‘तात्पुरते छतही काढा’

पावसाळ्याच्या कालावधीत अनेकजण इमारतींच्या गच्चीवर तात्पुरते वेदर शेडस् उभारतात आणि त्यासाठी रीतसर महापालिकेची परवानगी घेतात. ही परवानगी केवळ पावसाळ्यापुरतीच मर्यादित असते. मात्र, अनेकजण पावसाळा संपल्यानंतरही या शेडस् काढत नाहीत. त्यामुळे अशा तात्पुरत्या शेडस्ही काढण्याचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी दिले आहेत.