अंबरनाथ शहरातील मोरिवली पाडय़ात बांधण्यात येणाऱ्या एका इमारतीच्या बांधकामात पालिकेची दिशाभूल करत बांधकाम व्यावसायिकाने उभारलेल्या इमारतीला पालिकेने नोटीस बजावली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी ही नोटीस बजावली असून तीस दिवसांत इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यास सांगितले असून तसे न केल्यास त्या इमारतीवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात पालिकेकडून परवानगी न घेता अनेक भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे व चाळींची बांधकामे केली आहेत. यामुळे शहर विकासात सध्या मोठा अडथळा निर्माण झाला असून पालिकेने या अनधिकृत बांधकामांना पाडण्याचे धोरण राबविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची गय यापुढे केली जाणार नसून सगळ्यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वेकडील सत्यभामा डेव्हलपर्सचे अनिल दलाल व त्यांच्या भागीदारांनी गट क्रमांक १०, नगरभूमापन क्रमांक ९२८५ येथे पालिकेची दिशाभूल करत इमारतीचे बांधकाम केले आहे. या जागेवरील साडेचार हजार चौरस फूट भूखंडाचा आराखडा पालिकेकडून मंजूर केला. मात्र याबाबत पालिकेचे नियम व शर्तीचे उल्लंघन केले. तसेच इमारतीसंबंधित परवानग्या मिळविताना महत्त्वाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे पालिकेने विकासकाला नोटीस बजावत ३० दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पालिकेला कारवाई करावी लागेल, असे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी बजावलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता
दरम्यान याबाबत सत्यभामा डेव्हलपर्सचे अनिल दलाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या या व्यवसायातील भागीदार शीतल जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या इमारतीसाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता आम्ही केली असून यात बांधकामासाठी कोणतेही खोटे पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. पालिकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारेच बांधकाम करण्यात आले आहे. पालिकेकडून अचानक ही कारवाई करण्याची नोटीस आली याबद्दल आश्चर्य वाटत आहे.