ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे एका गर्भवती महिलेला बाळ गमवावे लागल्याप्रकरणी ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी चौकशीनंतर दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कळवा पोलिसांनी याप्रकरणी घोडे दाम्पत्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. केवळ ८०० रुपये नसल्याने घोडे यांना आपले बाळ गमावावे लागले होते.
याप्रकरणी सखोल तपास करण्यासाठी आणि दोषींचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सात महिन्यांची गर्भवती असलेल्या शारदा घोडे यांना प्रसूती कळा येऊ लागल्यामुळे कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे एका परिचारिकेने वैद्यकीय चाचण्यासाठी त्यांच्याकडे ८०० रुपयांची मागणी केली; परंतु तितकेच पैसे त्यांच्याकडे नसल्याने त्या परिचारिकेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पाच दिवसांपूर्वी घोडे दाम्पत्य जालना जिल्ह्यातून मजुरीच्या कामांसाठी कल्याणमध्ये आले होते. प्रवासादरम्यान त्यांची बॅग चोरीला गेल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. यानंतर या महिलेची रस्त्यावरच प्रसूती होऊन तिचे बाळ दगावले. दरम्यान, संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहेत.